"शरद पवारांनी उदयनराजेंच्या बालिश चाळ्यांना पाठिशी घातलं"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 10:55 AM2019-09-14T10:55:24+5:302019-09-14T11:24:20+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उदयनराजे भोसले भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उदयनराजे भोसले भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. दिल्लीत भाजपाध्यक्ष व गृहमंत्री अमित शहा, जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित उदयनराजे भोसले यांनी आज भाजपात प्रवेश केला. मात्र उदयनराजेंच्या भाजपा प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना टीका करत आचरट बालिश चाळ्यांना पाठिशी घालून काय मिळाले असा प्रश्न उपस्थित केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हणाले की, साहेब तुम्ही उदयनराजेंवर मनापासून प्रेम केले. सातारातल्या आपल्या जवळच्यांना दुखावलत. त्यांच्या सगळ्या आचरट बालिश चाळ्यांना पाठिशी घातलंत. पोटच्या पोरावानी प्रेम केलेत. खरा तर तुमचा स्वभाव तसा नाही. साहेब काय मिळाले? पण तरीही “यशवंतरावांचा सातारा जिल्हा शरद पवारांचा बालेकिल्ला” असं ट्विट त्यांनी केले.
उदयनराजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज होते म्हणून मी त्यांच्याशी आदराने बोलायचो, मात्र मी त्यांना कधीच नेता मानलं नाही. तसेच उदयनराजेंना विरोध असताना देखील शरद पवारांनी त्या विरोधाला न जुमानता नेहमीच उदयनराजेंच्या पाठीशी उभे राहिले, तर कॅालर उडवायची स्टाइल अशा चाळ्यांना देखील शरद पवार काही बोलले नाही कारण त्यांना सर्व माफ होतं. तसेच उदयनराजेंच्या जागी मी असतो तर माझी पक्षातून हकालपट्टी केली असती असे देखील त्यांनी एका मराठी वृत्तवाहीनीला प्रतिक्रिया देत म्हणटले आहे.
साहेब उदयनराजें वर तुम्ही मानापासून प्रेम केले सतारातल्या आपल्या जवळच्याना दुखावलत
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 14, 2019
त्यांच्या सगळ्या आचरट बालिश चाळयांना पाठिशी घातलत पोटच्या पोरावणी प्रेम केलेत
खरा तर तुमचा स्वभाव तसा नाही #साहेब काय मीळाले?
पण तरीही
"यशवंतरावांचा सातारा जिल्हा
शरदपवारांचा बालेकिल्ला"
तत्पूर्वी, उदयनराजे भोसले यांनी काल रात्री मध्यरात्री एकच्या सुमारास आपल्या खासदारपदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी जाऊन उदयनराजे भोसले यांनी खासदारपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन हेही उपस्थित होते. याचबरोबर, लोकसभा सदस्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर उदयनराजे भोसले यांना पोटनिवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. ही पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीसोबत घेण्यात यावी, तसेच लोकसभेला दगाफटका झाल्यास राज्यसभेचे सदस्यत्व मिळावे, या दोन अटी उदयनराजे भोसले यांनी भाजपा श्रेष्ठींपुढे ठेवल्या होत्या, त्या मान्य झाल्याने उदयनराजे भोसले यांनी भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली होती.