मुंबई - देशाचे हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत यापूढे महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न म्हणता वंदे मातरम् म्हणत संभाषणाला सुरुवात करतील अशी घोषणा राज्याचे नवे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर होवून सांस्कृतिक खात्याची जबाबदारी येताच स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली. यासदर्भात तसा शासकीय आदेशही जारी करण्यात आला आहे. त्यावरुन, आता माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुधीर मुनगंटीवार यांना चांगलंच सुनावलं आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी वंदे मातरम म्हणण्यासंदर्भात आदेश जारी केला आहे. त्यावरुन, आमदार जितेंद्र आव्हाड चांगलेच भडकले. भारतीय संस्कारांमध्ये नमस्कार आहे, अनेकजण जय भीम म्हणतात. पोलीस अधिकारी जय हिंद म्हणतात, कोणी सतश्रीअकाल म्हणेल. या देशात स्वातंत्र्य आहे, लोकांना मोकळा श्वास घेऊ द्या, तोही आता तुम्हाला विचारुन घ्यायचा का, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
''तुम्हाला सुधीर मुनगंटीवार म्हणायचं, सुधीर मुनगंटीवारजी म्हणायचं, सुधीरजी मुनगंटीवार म्हणायचं की सुधीर भाऊ म्हणायचं तेही जाहीर करून टाका. आता, महाराष्ट्रात आम्हाला यापुढे या-या नावाने हाक मारा, अशी लीस्टच जाहीर करुन टाका. हा देश स्वातंत्र्य झाला, देशाला स्वातंत्र्य मिळाले ते मोकळा श्वास घेण्यासाठी, तो श्वास कुठून कसा घ्यावा हेही तुम्हीच ठरवणार का?'', असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे. तसेच, अशी जोरजबरदस्ती करू नका, असेही आव्हाड यांनी म्हटले.
हॅलो ऐवजी वंदे मातरमने सुरुवात
वंदे मातरम् हे आपले राष्ट्रगान आहे. हा केवळ एक शब्द नसुन भारतीयांच्या भारतमाते विषयीच्या भावनांचे प्रतिक आहे. १८७५ मध्ये बंकीमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले हे गीत त्याकाळात स्वातंत्र्यासाठी लढणा-यांना उर्जा देण्याचं काम करत होते. ‘हे माते मी तुला प्रणाम करतो’ अशी भावना व्यक्त करत बंकीमचंद्रांनी मनामनात देशभक्तीचे स्फुल्लींग चेतविले. भारतीय मनाचा मानबिंदू असलेल्या या रचनेतील एकेक शब्द उच्चारताच देशभक्तीची भावना जागृत होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आपण हॅलो हा विदेशी शब्द त्यागत त्याऐवजी शासकीय कार्यालयांमध्ये यापूढे वंदे मातरम् म्हणत संभाषण सुरु करणार आहोत.