Join us

पवार-अदानी भेटीवर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया, सांगितलं भेटीचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 4:43 PM

हिंडेनबर्ग रिपोर्ट आणि चौफेर राजकीय आरोपांमुळे अदानी हे अडचणीत आले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी त्यांचा बचाव केला होता.

मुंबई - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उद्योगपती गौतम अदानी यांना लक्ष्य केलं आहे. हिंडेनबर्गच्या अहवालामुळे उद्योगपती गौतम अदानी अडचणीत सापडले आहेत. तर, त्यांच्या अदानी समुहाच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली होती. त्याचदरम्यान, अदानींच्या शेल कंपन्यांमधील २० हजार कोटी रुपयांवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही गंभीर आरोप केले होते, तसेच या प्रकरणाच्या जेपीसी द्वारे चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. मात्र, अदानींच्या जेपीसी चौकशी मागणीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विरोध दर्शवला होता. त्यानंतर, आता अदानी यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीवर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

हिंडेनबर्ग रिपोर्ट आणि चौफेर राजकीय आरोपांमुळे अदानी हे अडचणीत आले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी त्यांचा बचाव केला होता. दरम्यान, आज शरद पवार यांची भेट घेण्यासाठी गौतम अदानी सिल्व्हर ओकवर आल्याने चर्चांना उधाण आले आहे. अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी सिल्व्हर ओकवर येत शरद पवार यांची भेट घेतली. अदानी आणि शरद पवार यांच्यातील ही भेट सुमारे दोन तास चालली. मात्र, यादरम्यान, दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, हे मात्र समोर येऊ शकलेले नाही. आता, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, या भेटीमागे कुठलाही गैर अर्थ काढू नये, असेही त्यांनी सूचवलंय.  

शरद पवार यांचे सर्वच उद्योगपतींची चांगले संबंध आहेत. त्यामुळे अदानी आणि शरद पवार यांची भेट होणे विशेष गोष्ट नाही. शरद पवार यांनी बऱ्याच मोठ्या उद्योगपतींच्या घरातील वाद सोडवले आहेत. देशाच्या संसदेत ६० वर्षे सदस्य असलेला एकमेव प्रतिनिधी म्हणजे शरद पवार आहेत. त्यामुळेच, ते अनुभवी व्यक्तिमत्व असल्याने सर्व मंडळी त्यांच्याकडे येत असतात, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं. आव्हाड यांनी या भेटीवर राजकीय टिपण्णी करण्याचं टाळलं. 

विरोधी पक्षांनी केली होती मागणी

अमेरिकेतील फर्म हिंडेनबर्गने जानेवारी महिन्यात प्रसिद्ध केलेल्या अहवालामुळे अदानी समूह अडचणीत आला होता. अदानी समुहावर अफरातफर आणि अकाऊंटमध्ये फसवणूक केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर अदानी समुहाचे शेअर मोठ्या प्रमाणावर कोसळले. मात्र, अदानी समुहाने हे आरोप फेटाळून लावले होते. पण, गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कथित संबंध आणि हिंडेनबर्गचा अहवाल यामुळे विरोधकांकडून पंतप्रधान मोदी आणि गौतम अदानी यांच्यावर आरोप करण्यात येत होते. नुकत्याच आटोपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा मुद्दा गाजला होता. तसेच १९ विरोधी पक्षांनी संयुक्त संसदीय समितीकडून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. विरोधी पक्षांनी हा मुद्दा लावून धरला असतानाच शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे अदानींचा बचाव केल्याने विरोधकांची धार बोथट झाली होती. आता आज पुन्हा एकदा शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात भेट झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. 

टॅग्स :जितेंद्र आव्हाडशरद पवारराष्ट्रवादी काँग्रेस