Shiv Sena Thackeray Group News: मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, पुणे, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासह राज्यभरातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत असल्याचे चित्र आहे. अनेक वर्ष पक्षासाठी काम केलेले लोकही उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत आहेत. अलीकडेच कोकणातील ठाकरे गटाचा मोठा चेहरा असणाऱ्या राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंना रामराम करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. तर, दुसरीकडे भास्कर जाधव हेही ठाकरे गटाची साथ सोडू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ठाकरे गटाला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही, तसेच पक्षाला एकामागून एक धक्के बसत आहेत. अशातच मुंबईतील एका पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि अनिल परब यांच्यावर टीका करत संतप्त होऊन पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे.
विलेपार्ले विधानसभेबाबत निर्णय घेणारे संजय राऊत आणि अनिल परब कोण आहेत? ही विधानसभा ‘आप’ला दिली होती. पण आम्ही ‘झाडू’बरोबर काम करायला विरोध दर्शवला. त्यामुळे ती जागा शिवसेनेकडे आली. भाजपाकडून ती जागा काढून शिवसेनेकडे घ्यायची होती, ही माझी इच्छा होती. पण माझी इच्छा लक्षात न घेता मला बाहेरच्या वॉर्डात टाकले. म्हणजे तुमचे मनसुबे काय आहेत? तुम्हाला संघटना जिंकवायची आहे की भाजपा जिंकवायची आहे? म्हणून हा माझा निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया जितेंद्र जानावळे यांनी दिली. ठाकरे गटातील पदाचा राजीनामा दिल्यानंतर जितेंद्र जानावळे उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. तसेच पुढील काहीच दिवसांत जितेंद्र जानावळे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
मला आता घाणेरड्या राजकारणाचा कंटाळा आला आहे
मीडियाशी बोलताना जानावळे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्यावर माझा राग नाही. विभागीय राजकारण सुरू होते, त्याला कंटाळलो होतो. माझी राजकीय कोंडी विभागात केली. एवढे मी लढलो, माझी नोकरी आणि घर गेले. तरीही मी जिद्दीने उभा होतो. माझे घर, पक्ष गेले, पण मी कधी रडत आलो नाही. पण आता घाणेरड्या राजकारणाचा कंटाळा आला आहे, असे जानावळे यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरेंना पत्र लिहून दिला होता राजीनामा
जितेंद्र जानावळे यांनी राजीनामा देताना उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून आपली व्यथा मांडली होती. मी आपणाकडे शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माझ्या "उपविभागप्रमुख" पदाचा राजीनामा देत आहे. गेली ६ वर्ष मला माझ्या कार्यक्षेत्राच्या बाहेर नियुक्त करून माझी राजकीय गोची करण्याचे षड्यंत्र विभागातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून केले जात आहे. गेल्या पालिका निवडणुकीत मी नोकरी घर सोडून भाजपाच्या विरोधात निवडणूक जोमाने लढलो. अवघ्या थोड्याच मतांनी हरलो, पण खचलो नाही आणि परत जिद्दीने माझे संघटनात्मक जनसेवेचे, रुग्णसेवेचे काम विभागात चालू ठेवले डोक्यात एकच विचार होता एकदा तरी विलेपार्ले विधानसभेतील माझ्या वॉर्ड ७१ मध्ये विजयाचा भगवा फडकविणार पण दुर्दैव मला विभागप्रमुख मा अनिल परब यांनी गेली ६ वर्ष विभागातून बाजूच्या विधानसभेत म्हणजे बाहेर ठेवले वारंवार विभागप्रमुख अनिल परब यांना विभागात परत घेण्याची विनंती मी केली. पण त्यांनी फक्त तारखाच दिल्या आणि निराशा केली. एवढेच नाही तर मी वास्तव्यास असलेल्या असलेल्या विले पार्ले विधानसभेच्या बैठकींना मी स्थानिक पदाधिकारी नसल्यामुळे मला अपमान ही सोसावा लागला, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, हे सर्व मला डावलण्याचे प्रकार माझ्या सोबत जाणूनबुजून होत होते हे मला जाणवत होते. तरी ही मी सहा वर्ष संयम ठेऊन संघटना वाढीसाठी काम करीत राहिलो. याबाबत मी आपल्याला आणि आदित्य ठाकरे यांना मातोश्री येथे प्रत्यक्ष भेटून विभागात चुकीच्या पद्धतीने चाललेल्या संघटनात्मक पद्धतीची व्यथा मांडली परंतु आपणाकडून ह्यावर अद्याप काहीच तोडगा निघालेला नाही. आंदोलनात पुढे असणारा, पोलिसांच्या लाठ्या खाणारा, आंदोलनाच्या केसेसबाबत कोर्टात फेऱ्या मारणाऱ्या माझ्या सारख्या संघटनात्मक व सामाजिक करणाऱ्या शिवसैनिकाची जर ही परिस्थिती होत असेल तर नेमका निकष काय लावला ? हा प्रश्न मनाला भेडसावतो. या सर्व संघटनात्मक चुकीच्या पद्धतीला मी कंटाळलो असून मला कोणाच्या दबावाखाली आणि कार्यरत असलेल्या विभागाच्या बाहेर पदाधिकारी म्हणून काम करायला एक शिवसैनिक म्हणून जमणार नाही. माझी क्षमता असतानाही मला डावलण्यात येते हे मी किती दिवस सहन करायचे हा विचार करत बसण्यापेक्षा मी माझ्या "उपविभागप्रमुख" पदाचा राजीनामा जड अंतःकरणाने आपणाकडे या पत्राद्वारे देत आहे. साहेब मला माफ करा, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.