मुंबई: Sanjay Raut Press Conference :- सक्तवसुली संचलनालयाचे अधिकारी खंडणीचे रॅकेट चालवतात. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेतेदेखील सहभागी आहेत. येत्या काही दिवसांत ईडीचे काही अधिकारी तुरुंगात जातील, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आम्ही काही नेत्यांच्या तक्रारी ईडीकडे केल्या. मात्र त्यांनी काहीच कारवाई केली नाही. आता मुंबई पोलीस याचा तपास करतील, असं राऊत पत्रकारांना संबोधित करताना म्हणाले.
जितेंद्र नवलानी ईडीचा वसुली एजंट म्हणून काम करत आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकल्यावर त्या कंपन्या नवलानीच्या ७ कंपन्यांमध्ये पैसा जमा करतात. त्यानंतर कंपन्यांविरोधात सुरू असलेली कारवाई थंडावते. ईडीकडून सुरू असलेल्या या खंडणी रॅकेटमध्ये भाजप नेत्यांचादेखील सहभाग आहे. त्यांची नावं लवकरच पुढे आणू, असं राऊत यांनी सांगितलं.
ईडीच्या एका अधिकाऱ्यानं उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी राजीनामा दिला. त्यानंतर त्या अधिकाऱ्यानं भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली. त्यानं भाजपच्या ५० उमेदवारांचा खर्च केला आहे. ईडी आता भाजपची एटीएम झालीय. याबद्दल मी २८ पानांचं एक पत्र पंतप्रधान मोदींना लिहिलं आहे. कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे. अशी आणखी १० पत्रं मी मोदींना लिहिणार आहे, अशी माहिती राऊत यांनी दिली.