‘जितो’ने पूरग्रस्तांना केली अडीच कोटींची मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 01:55 AM2019-08-18T01:55:15+5:302019-08-18T01:55:36+5:30
‘जितो’च्या मुंबईतील सदस्यांनी रोख रकमेसह जीवनाश्यक वस्तूंची मदत पूरग्रस्तांना केली आहे.
मुंबई : कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या चार जिल्ह्यांमध्ये आलेल्या महापुरानंतर येथील स्थानिकांना मदत करण्यासाठी सर्वच स्तरातून नागरिक पुढे सरसावले आहेत. देशासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला जात असतानाच आता ‘जैन इंटरनॅशनल टेÑड आॅर्गनायजेशन’ (जितो)देखील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावली आहे. ‘जितो’ने पूरग्रस्तांना २ कोटी ५१ लाख १२ हजारांची मदत केली आहे.
‘जितो’च्या मुंबईतील सदस्यांनी रोख रकमेसह जीवनाश्यक वस्तूंची मदत पूरग्रस्तांना केली आहे. जीवनाश्यक वस्तूंमध्ये भांडी, कपडे, अन्नधान्य यांसारख्या साहित्याचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे ‘जितो’च्या सदस्यांनी निधी आणि मदत गोळा केल्यानंतर कोल्हापूरसह लगतच्या प्रदेशात मदत रवानादेखील झाली आहे. ‘जितो’चे तेथील सदस्य यासंदर्भात समन्वयाची भूमिका बजावत असून, तेथील पूरग्रस्तांना मदत वेळेत मिळावी यासाठी कार्यरत आहेत.
मुलुंड, पुणे, वाळकेश्वर, जोधपूर, घाटकोपर, गवालिया टँक, भायखळा, चेन्नई, अहमदाबाद, कोलकाता, दिल्ली, औरंगाबाद, बंगळुरू, सांगली, कोल्हापूर, उदयपूर, सुरत, भिलवडा, ठाणे, जुहू, नवी मुंबई येथील ‘जितो’च्या सदस्यांनी ही मदत केली आहे. दरम्यान, मदतीमध्ये ३.२ लाख बिस्किटे, १० हजार चटया, १० हजार भांडी या साहित्याचा समावेश असून, यात उत्तरोत्तर आणखी भर घातली जाणार आहे.