लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पर्यावरणाच्या ऱ्हासासंदर्भात जनजागृती करण्यासह पर्यावरण संवर्धनासाठी मुंबई महापालिकेच्या एफ-दक्षिण विभागाने, परळ येथील एफ-दक्षिण विभागाच्या इमारतीच्या आवारात ‘पर्यावरणाची जत्रा’ भरवली आहे. या जत्रेत पर्यावरण मित्र सांताक्लॉज, ओला कचरा-सुका कचरा वर्गीकरण केंद्रासारखे उपक्रम राबविले आहेत.या जत्रेचे उद्घाटन शुक्रवारी एफ-दक्षिण वॉर्डाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांच्या उपस्थितीत झाले. ही जत्रा ६ जुलैपर्यंत चालू राहणार असून नागरिकांनी या जत्रेला भेट द्यावी, असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कनिष्ठ अधीक्षक गणेश टिकम यांनी केले. या जत्रेमध्ये येणाऱ्या नागरिकांना पर्यावरणासंदर्भात माहिती देण्यात येत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती करण्यात येत आहे. निसर्गाची होणारी हानी, वृक्षतोड थांबविणे, उघड्यावर शौच करू नये याविषयी पथनाट्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.ओला कचरा, सुका कचरा वेगळा ठेवावा, कचऱ्यापासून उपयुक्त हरित संपत्ती बनवणे, खत बनवणे याची प्रात्यक्षिके करून दाखवली जातात. मलेरिया आणि डेंग्यूपासून बचावासाठी उपाय सांगितले जात आहेत. पोलिओ डोस दिले जात आहेत. पर्यावरण संवर्धनासंदर्भात टॅटू काढले जात आहेत. या जत्रेमध्ये हेरिटेज वास्तंूच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. बोलक्या पोपटाचे आकर्षणपर्यावरण जत्रेत बोलक्या पोपटाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी जर पर्यावरणाकडे गांभीर्यपूर्वक लक्ष दिले नाही तर, खूप मोठी हानी होईल. बोलक्या पोपटासोबत ज्योतिषीसुद्धा नागरिकांमध्ये जनजागृती करत आहे. नागरिकांकडून चांगला प्रतिसाद पालिकेने या जत्रेच्या निमित्ताने नागरिकांना आवाहन केले आहे की, तुमच्या घरातील जुन्या व वापरात नसलेल्या वस्तू आणि कपडे इतरत्र फेकू नका. त्या वस्तू पर्यावरणाच्या जत्रेत आणून द्या; त्या वस्तू गरजूंना देण्यात येतील. पालिकेच्या या आवाहनाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
जनजागृतीसाठी ‘पर्यावरण जत्रा’
By admin | Published: July 04, 2017 6:27 AM