आग विझविताना जिवाची बाजी
By admin | Published: June 12, 2015 05:53 AM2015-06-12T05:53:05+5:302015-06-12T05:53:05+5:30
दिघामधील मुकुंद कंपनीला बुधवारी रात्री भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी जीव धोक्यात घालून आग नियंत्रणात आणली
नवी मुंबई : दिघामधील मुकुंद कंपनीला बुधवारी रात्री भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी जीव धोक्यात घालून आग नियंत्रणात आणली. जवानांनी प्रसंगावधान राखले नसते तर पूर्ण कंपनी व बाजूची झोपडपट्टी जळून खाक झाली असती.
रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास मुकुंद स्टील कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरला आग लागली. औद्योगिक वसाहतीमधील मोठ्या उद्योगांमध्ये या कंपनीचा समावेश होतो. येथील मोठ्या ट्रान्सफॉर्मरसाठी मोठ्या प्रमाणात आइलची गरज असते. कंपनीत जवळपास ६० ते ७० फुटावर आॅइलची टाकी बसविण्यात आली होती. या टाकीलाही आग लागली. महापालिकेच्या वाशी, नेरूळ व ऐरोली अग्निशमन दलासह एमआयडीसी व ठाण्यामधूनही टँकर मागविण्यात आले होते. जवळपास ४० अग्निशमन जवानांनी आग विझविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. महापालिकेच्या जवानांनी जवळपास दीड हजार लिटर फोम आगीवर टाकला. आगीच्या ठिकाणी स्फोट झाल्यामुळे कंपनी परिसरात व बाजूच्या झोपडपट्टीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आग वाढली असती तर पूर्ण कंपनी जळून खाक झाली असती शिवाय पूर्ण झोपडपट्टीलाही आग लागली असती. अग्निशमन दलाच्या जवानांनी पहिल्यांदा आग पसरणार नाही याची काळजी घेतली. पहाटे साडेतीन वाजेपर्यंत पूर्णपणे आग नियंत्रणात आणली.
कंपनीमध्ये ६० ते ७० फूट उंचावर आग लागली असल्यामुळे ती विझविण्यास अडचणी येत होत्या. कंपनीमधील आगनियंत्रण यंत्रणा काही प्रमाणात सुरू होती. परंतु बहुतांश यंत्रणा बंदच होती. यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनाही गैरसोयींना सामोरे जावे लागले. कंपनीच्या बाहेरून पाणी व फोमचा मारा करून आग नियंत्रणात आणली. जवानांनी प्रसंगावधान राखले नसते तर मोठी दुर्घटना घडून मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली असती. तसेच ही आग भडकल्यास इतर ठिकाणी पसरली असती. जवानांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी विजय राणे, टीबीआयएचे सुरेंद्र चौधरी व इतर अधिकारी स्वत: घटनास्थळी उपस्थित होते.(प्रतिनिधी)