जियाच्या जिद्दीला सलाम! मुंबईच्या सागर कन्येचा पंतप्रधानांच्या हस्ते होणार सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 12:24 PM2022-01-25T12:24:16+5:302022-01-25T12:25:15+5:30
मुंबईच्या जिया राय हिची प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी क्रीडा श्रेणीत निवड झाली आहे.
मुंबई-
मुंबईच्या जिया राय हिची प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी क्रीडा श्रेणीत निवड झाली आहे. १३ वर्षीय जिया राय दिव्यांग असून अपंगत्वावर मात करत तिने ओपन वॉटर पॅरा स्विमींग आणि ओपन वॉटर स्विमींगमध्ये जागतिक विक्रम प्रस्थापीत केला आहे.
प्रजासत्ताक दिनी 'राष्ट्रीय बाल पुरस्कार' पंतप्रधान मोदींच्या हस्ते देण्यात येणार आहे. स्वमग्नता अर्थात ऑटिझम असलेल्या व्यक्तिच्या कार्यक्षमतेवर कुणालाही शंकाच येईल. मात्र, जिया राय हिने हा समज खोटा ठरवला आहे.
जियाने एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडिया हे अंतर साडे तीन तासात पोहून पार करत विक्रमाची नोंद केली. जियाला ऑटिझम आहे तरीही ती उत्तम जलतरणपटू बनली आहे. जियाला बोलता येत नाही, ती स्वमग्न असते. जिया अपंग असताना ही तिने धडधाकट असलेल्या लोकांना लाजवेल अशी कामगिरी केली आहे. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी जीया हिने पोहण्यात विश्वविक्रम केला आहे. त्यामुळे मुलांमध्ये जे कमी आहे ते न पाहता , ते काय करू शकतात याकडे लक्ष द्यावे असे तिचे वडील सांगतात.