Join us

जे.जे. रुग्णालयात शवविच्छेदन प्रक्रियेच्या तपासणीसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 12:54 AM

नवी हक्क आयोगाच्या निर्देशानुसार ही समिती स्थापन करण्यात आली असून, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे प्रमुख या समितीच्या अध्यक्षपदी असणार आहेत.

मुंबई : जे.जे. रुग्णालयात शवविच्छेदन व्हिसेरांची तपासणी, कामाची विभागणी व अन्य निगडित प्रक्रियेसाठी १४ सदस्यीय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. मानवी हक्क आयोगाच्या निर्देशानुसार ही समिती स्थापन करण्यात आली असून, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे प्रमुख या समितीच्या अध्यक्षपदी असणार आहेत.जे.जे. रुग्णालयातील प्रलंबित व्हिसेरांच्या तपासणीत रुग्णालयावर पडणारा ताण व शवविच्छेदन व्हिसेरांची तातडीने निपटारा होण्याची गरज लक्षात घेऊन, या समितीत सार्वजनिक आरोग्य, नगरविकास, गृह, विधि व न्याय, महापालिका प्रतिनिधी, सायन मेडिकल कॉलेज एलटीएमसी विभागप्रमुख, पोलीस सर्जन यांचा समावेश करण्यात आला आहे. जे.जे. रुग्णालयातील पॅथॉलॉजी विभागाच्या कामकाजात सुरळीतपणा येण्यासाठी अमीकम क्युरी यांनी केलेल्या शिफारशींचे परीक्षण व विश्लेषण करून त्याबाबतची अंमलबजावणी होण्याच्या अनुषंगाने ही समिती अहवाल सादर करणार आहे.जिल्हा रुग्णालयांमध्ये शवविच्छेदन व्हिसेरांची तपासणी व विश्लेषण करता येईल का, याबाबतची व्यवहार्यता ही तज्ज्ञ समिती तपासणार आहे. मुंबई व ठाणे शहरातील शवविच्छेदन व्हिसेरा तपासणी नमुन्यांची समान विभागणी ही मुंबई व ठाणे शासकीय व निमशासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत पोलीस ठाण्यांप्रमाणे देण्याबाबत समितीने विचार करावा, असे सुचविण्यात आले आहे.

टॅग्स :मुंबई