जेजेचा झेंडा नेदरलँडमध्ये फडकला
By संतोष आंधळे | Published: July 5, 2024 08:04 PM2024-07-05T20:04:12+5:302024-07-05T20:04:47+5:30
वैद्यकीय शिक्षण विभागाने अभिनंदन केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : जागतिक वैद्यकीय विश्वात एन्डोस्कोपी सर्जरी विश्वात प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या यूरोपियन असोसिएशन ऑफ एंडोस्कोपिक सर्जरीच्या वैद्यकीय परिषदेत जे.जे. रुग्णालयाच्या सर्जरी विभागातील दोन शस्त्रक्रियेच्या व्हिडिओला पुरस्कार मिळाले आहेत. विशेष म्हणजे जगभरातून ८४ शस्त्रक्रियांचे व्हिडिओ या परिषदेसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील ९ उत्कृष्ट शस्त्रक्रियांचे व्हिडिओ परीक्षकांकडून निवडण्यात आले. त्यामध्ये दोन व्हिडिओ हे जे जे रुग्णालयाचे आहेत. संपूर्ण देशातून जे जे रुग्णालयाच्या विभागाला हा मान मिळाला असल्यामुळे त्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाने अभिनंदन केले आहे.
जे.जे. रुग्णालयातील जनरल सर्जरी विभाग दरवर्षी नावीन्यपूर्ण सर्जरी करत असतात. प्रगत तंत्रज्ञानाचा आधार घेत त्या या शस्त्रक्रिया या जे.जे. सारख्या शासकीय रुग्णालयात करत असतात. २०२३ मध्ये पोलंड येथे झालेल्या याचा वैद्यकीय परिषदेत सर्जरी विभागाला एक पुरस्कार मिळाला होता. यापूर्वी या विभागाने अमेरिकेतील सोसायटी ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टिनल अँड एंडोस्कोपिक सर्जन या वैद्यकीय परिषदेत २०१६ ते २०१९ मध्ये बोस्टन, ह्युस्टन, सिएटल आणि बाल्टिमोर या ठिकाणी झालेल्या परिषदेत आपल्या नावीन्यपूर्ण शस्त्रक्रिया दाखवून पुरस्कार मिळविले आहेत.
जे.जे. रुग्णालय जरी शासकीय रुग्णालय असले तरी ते ग्रांट मेडिकल कॉलेज सोबत संलग्न आहेत. याठिकाणी देशभरातून विद्यार्थी सर्जरी विषय शिकण्यासाठी येत असतात. सर्जरी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ग्रांट मेडिकल कॉलेज मिळावे यासाठी चढाओढ सुरु असते. या ठिकाणी सर्व निवासी डॉक्टरांना प्रचलित शस्त्रक्रियापासून ते अत्याधुनिक शस्त्रक्रिया शिकविल्या जातात. सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळेल यासाठी विशेष प्रयत्न केले जातात.
शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया करून त्या जागतिक पातळीवर तज्ज्ञ समोर परिषदेत मांडण्याकरिता सर्जरी विभाग विशेष प्रयत्न करत असतो. काही दिवसांपूर्वीच जे.जे. रुग्णालयातील सर्जरी विभागाच्या डॉक्टरांची टीम नेदरलँडवरून परत आली आहे. या वैद्यकीय परिषदेत सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. अजय भंडारवार, मानद प्राध्यापक डॉ. अर्शद खान, डॉ. अमोल वाघ, डॉ. काशिफ अन्सारी आणि डॉ. सुप्रिया भोंडवे यांचा समावेश आहे.
या विभागाला मिळालेल्या पुरस्काराची दखल वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतली असून विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त राजीव निवतकर, संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर आणि रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे आणि अधिक्षक डॉ. संजय सुरासे यांनी सगळ्या विभागातील डॉक्टरांचे अभिनंदन केले आहे.
गेल्या काही वर्षांपासून आमच्या विभागात दरवर्षी काही तरी नवीन शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. तसेच विद्यार्थ्यांची चिकित्सक वृत्ती वाढावी, संशोधनात भर पडावी, तसेच एखादी अवघड शस्त्रक्रिया असेल तर त्याला कसे सामोरे जावे याचे प्रशिक्षणसुद्धा याठिकाणी विद्यार्थ्यांना दिले जाते. जे काही पुरस्कार विभागले मिळाले आहेत त्यामध्ये विभागातील संपूर्ण टीमच्या सदस्यांचा वाटा आहे. तसेच रुग्णालय प्रशासनानेसुद्धा वेळच्या वेळी सहकार्य केल्यामुळे शक्य झाले आहे. - डॉ. अजय भंडारवार, विभागप्रमुख, जनरल सर्जरी विभाग, जे. जे. रुग्णालय