जे.जे. रुग्णालयात २ निवासी डॉक्टरांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 02:13 AM2018-05-20T02:13:10+5:302018-05-20T02:13:10+5:30
एका महिलेसह तिघांना अटक : गुन्हा दाखल, जखमी झालेले दोन्ही डॉक्टर्स रुग्णालयात दाखल
मुंबई : सर जे.जे. रुग्णालयात शनिवारी सकाळी रुग्णाच्या नातेवाइकांनी दोन निवासी डॉक्टरांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी एका महिलेसह तिघांना अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जे.जे. मार्ग पोलिसांनी दिली. या मारहाणीत जबर जखमी झालेल्या दोन्ही डॉक्टरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ जे.जे. रुग्णालय, गोकुळदास रुग्णालय, कामा आणि सेंट जॉर्ज रुग्णालयातील जवळपास ४५० हून अधिक निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ६.४८ च्या दरम्यान ४५ वर्षीय झैदाबीबी शहा या महिलेचा मृत्यू झाला. त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या नातेवाइकांनी वॉर्ड क्रमांक ११ या सर्जरी वॉर्डमध्ये डॉ. अतिश पारीख आणि डॉ. शाल्मली धर्माधिकारी यांना मारहाण केली. यात डॉ. पारीख यांच्या एका गालाला जबर दुखापत झाली आहे. दोन्ही डॉक्टरना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वॉर्डमधील खुर्च्या, संगणक आणि अन्य वस्तूंची तोडफोडही करण्यात आली आहे. तसेच, मारहाण थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या वॉर्डबॉय आणि परिचारिकांनाही धक्काबुक्की करण्यात आली.
या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जे.जे. मार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी महमद अल्ताफ शेख (३२), सोनू सनाउल्लाह शा (२३), रिहान शा (२२) आणि समिला खातून सनाउल्लाह शा (२०) यांना अटक करण्यात आली आहे. शिवाय, मारहाण आणि सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांची संघटना मार्डकडून रुग्णालय परिसरात दुपारी १२.३० वाजता निषेध करण्यात आला.
याविषयी सर जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी सांगितले की, दोन निवासी डॉक्टरांना नातेवाइकांनी मारहाण केली आणि रुग्णालयाची तोडफोड केली. घडलेल्या या घटनेप्रकरणी या प्रकरणी जे. जे. मार्ग पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही घटना दु:खद असून या संपूर्ण प्रकरणाची सखेल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
आणखी एक घटना?
शनिवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास अतिदक्षता विभागात दाखल झालेल्या रुग्णाला पाहण्यास मज्जाव केल्याने सुरक्षारक्षक आणि वॉर्डबॉयलाही एका नातेवाइकाने मारहाण केल्याचे समजते. मात्र या घटनेला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या नातेवाइकाला सुरक्षा मंडळाच्या पोलिसांकडे देण्यात आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी सांगितली. या घटनांनंतर जे.जे. रुग्णालयात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. गांभीर्य नाही जे.जे. रुग्णालयातील घटनेच्या पार्श्वभूमीवर निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेसंबंधी सकाळी वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांच्यासोबत बैठक पार पडली. मात्र या वेळी काहीच आश्वासन देण्यात आले नाही. गेल्या दोन वर्षांपासून निवासी डॉक्टरांवर राज्यासह मुंबईत अनेक हल्ले करण्यात आले. वेळोवेळी याविषयी आवाज उठवून सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित केले, मात्र यंत्रणांना याचे गांभीर्यच नसल्याचे दिसते आहे, ही अत्यंत खेदाची बाब आहे, असे जे. जे.च्या मार्ड संघटनेचे अध्यक्ष सारंग दोनारकर यांनी सांगितले.
काम बंद आंदोलन
जे.जे. रुग्णालय, गोकुळदास रुग्णालय, कामा आणि सेंट जॉर्ज रुग्णालयातील जवळपास ४५० हून अधिक निवासी डॉक्टरांनी शनिवारी संपूर्ण दिवस काम बंद आंदोलन केले. या निवासी डॉक्टरांच्या काम बंद आंदोलनामुळे रुग्णसेवेवर परिणाम होणार आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठोस पाऊल उचलले जात नाही तोपर्यंत काम बंदच ठेवण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला आहे.