मुंबई : जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या विरोधात करण्यात आलेल्या भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांची चौकशी केली जाईल, असे सरकारतर्फे विधानसभेत सांगण्यात आले.
डॉ. सापळे यांनी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असताना तसेच आता जेजे रुग्णालयात अनेक प्रकरणात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार केल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनी केला. जेजे रुग्णालयात औषध, यंत्रसामग्री खरेदीच्या बिलांवर ५ ते १० टक्के कमिशन घेतल्याशिवाय सह्या करत नाहीत, असेही त्या म्हणाल्या. मंत्री शंभूराज देसाई यांनी या सर्व प्रकरणांची चौकशी करण्याचे आश्वासन दिले.
डॉ. सापळे यांच्यावर केलेले आरोप- डॉ. सापळे भाड्याची गाडी वापरत असून त्याचे महिन्याला एक लाख रुपयांचे बिल शासनाला सादर करतात. हा खर्च ७० ते ८० लाख रुपयांवर गेला आहे.- मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्तसंक्रमण शास्त्र विभागात असताना रक्तातील प्लाझ्मा विकून शासनाच्या परवानगीशिवाय १३ लाख रुपये जमा केले आणि त्यातून ॲम्ब्युलन्स खरेदी करून ती आईने दान दिल्याचे सांगितले.- ऑगस्ट २०२२ मध्ये सहसंचालक पदावर पदोन्नती आणि संभाजीनगर येथे बदली झाली आहे. मात्र अजूनही त्यांच्या बदलाचे आदेश निघाले नाहीत.