मुंबई : सर जे.जे. रुग्णालयाला अमेरिकेत सॅजेस पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले आहे. या रुग्णालयात २०१६ साली एका महिला रुग्णाला ‘पॅराथायरॉइड एडेमोना’ या आजारावर दुर्बिणीने एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया केली होती. या शस्त्रक्रियेमुळे ही महिला रुग्ण आजारमुक्त झाली आणि याचमुळे जागतिक पातळीवर अमेरिकेने या शस्त्रक्रियेची दखल घेतली आहे. जे.जे. रुग्णालयाला मिळालेल्या पुरस्कारानिमित्त राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी टिष्ट्वट करून अभिनंदन केले आहे.या शस्त्रक्रियेला जगात मान्यता मिळाली असून यामुळे रुग्णालयाला ‘सोसायटी आॅफ अमेरिकन गॅस्ट्रोइंटेस्टाइनल अँण्ड एंडोस्कोपिक सर्जन’ (सॅजेस) या पुरस्काराने अमेरिकेत सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कारासाठी हजारांहून अधिक प्रबंध जगभरातून आले होते. यातून छाटणी होत होत अखेर पहिला पुरस्कार जे. जे. रुग्णालयाला जाहीर करण्यात आला. २०१६ पासून सलग तिसऱ्यांदा हा पुरस्कार पटकावला आहे. ग्रॅण्ट रोड परिसरात राहणाºया फरहात शेख या महिलेवर करण्यात आलेली ही शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक होती. या महिलेमध्ये असलेला ट्युमर हा थायरॉइड ग्रंथीच्या आत लपलेला होता. त्यामुळे या महिलेला होणारा कंबरदुखी तसेच हाडांच्या दुखण्याच्या त्रासाचे निदानच होत नव्हते. एक्टोपिक पॅराथायरॉइड हा एक अत्यंत दुर्मीळ आजार आहे. याचे वेळेत निदान होणे कठीण असते. या आजाराने त्रस्त रुग्णाच्या शरीरातील हाडे ठिसूळ होऊ लागतात. रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण वाढते.या महिलेने जे. जे. रुग्णालयात येण्याआधी अनेक डॉक्टरांशी संपर्क केल्यानंतरही या आजारावर योग्य तोडगा उपलब्ध झाला नव्हता. ज्या वेळी ही महिला जे. जे. रुग्णालयात आली, त्या वेळी शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. अजय भंडारवार यांच्या मार्गदर्शनाखालील डॉक्टरांच्या पथकाने त्यांची पॅराथॉर्मन तपासणी केली असता या महिलेच्या गळ्यातील थायरॉइड ग्रंथींमध्ये ट्युमर दडला असल्याचे आढळले. या ट्युमरमुळे पायाच्या हाडांपर्यंत पोहोचणारे कॅल्शियमच हाडांना मिळत नव्हते. यामुळे हे कॅल्शियम रक्तामध्ये जात होते. या महिलेच्या जबड्याच्या भागातून उपकरण टाकून शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे या शस्त्रक्रियेमुळे शरीराच्या बाह्य भागावर कोणताही व्रण उमटला नाही. यशस्वीरीत्या पार पडलेल्या या शस्त्रक्रियेच्या पद्धतीचे अनुकरण आता जगभरातील डॉक्टर करणार आहेत.
जे.जे. रुग्णालयाला जागतिक स्तरावर ‘सॅजेस’ पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 6:59 AM