JJ रुग्णालयात गोळीबार करणाऱ्या आरोपीला ३२ वर्षांनी अटक; नाव बदलून दडवली होती ओळख
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 05:56 AM2024-10-20T05:56:21+5:302024-10-20T05:56:59+5:30
या आरोपीचे खरे नाव त्रिभुवन रामपती सिंग असे असून, त्याने श्रीकांत राय रामपती ऊर्फ प्रधान असे नाव लावत आपले अस्तित्व लपवले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: जे. जे. रुग्णालयात एके ४७ रायफलने गोळीबार करून हत्याकांड घडवून आणलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने तब्बल ३२ वर्षांनी अटक केली आहे. या आरोपीचे खरे नाव त्रिभुवन रामपती सिंग असे असून, त्याने श्रीकांत राय रामपती ऊर्फ प्रधान असे नाव लावत आपले अस्तित्व लपवले होते.
१९९२ साली दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकरचा नवरा इब्राहिम ऊर्फ इब्राहिम लंबू याची अरुण गवळी टोळीकडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर व्ही. पी. रोड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आलेले शैलेश हळदणकर व बिपीन शेरे यांनी इब्राहिम पारकर याची हत्या केल्याचा संशय होता. हे दोन्ही आरोपी जखमी असल्याने त्यांना जे. जे.मध्ये दाखल करत बंदोबस्त लावण्यात आला होता.
१२ सप्टेंबर १९९२ रोजी अटक आरोपी सुभाषसिंग ठाकूर, ब्रिजेश सिंग व त्याच्या सहकाऱ्यांनी जे. जे.मध्ये गोळीबार केला होता. यात शैलेश हळदणकर आणि दोन पोलिसांचा मृत्यू झाला होता. यातील आरोपीला गोळी लागून ते जखमी झाले होते व पळून गेले होते. याची नोंद भायखळा पोलिस ठाण्यात होती.
यातील आरोपीचा शोध सुरू असतानाच गोळी लागलेला आरोपी उत्तर प्रदेशातील मिर्झापूर मध्यवर्ती कारागृहात असल्याची माहिती मिळाली. त्याने स्वत:ची ओळख लपविण्यासाठी खोटे नाव सगळीकडे लावले होते. याबाबत पोलिसांनी तपास करून विशेष टाडा न्यायालयाकडून वॉरंट प्राप्त केले होते.