Join us

जे.जे. रुग्णालयात भरली ‘लॉमेडिकॉन २०१५’

By admin | Published: April 05, 2015 1:03 AM

पोलीस आणि डॉक्टरांना अनेकदा एकत्र काम करावे लागते. पण, हे काम करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

मुंबई : पोलीस आणि डॉक्टरांना अनेकदा एकत्र काम करावे लागते. पण, हे काम करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यामुळे काही गोष्टींना विलंब होतो. डॉक्टर, पोलीस आणि न्यायालयीन बाबी यांची सांगड घालून कशाप्रकारे काम करता येऊ शकते, याविषयी चर्चा करण्यासाठी जे.जे. रुग्णालयात शनिवारी ‘लॉमेडिकॉन २०१५’चे आयोजन करण्यात आले होते.जे.जे. रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागातर्फे पहिल्यांदाच या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एस. राधाकृष्णन, मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. नरेश चंद्रा, पोलीस महानिरीक्षक (सीआयडी) ब्रिजेश सिंग, आयपीएस व्ही. व्ही. लक्ष्मी नारायणन, अ‍ॅड. बिरेंद्र सराफ, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने, डॉ. हरीश पाठक, शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. एम.बी. तायडे आदी मान्यवर उपस्थित होते. या परिषदेची संकल्पना डॉ. व्ही.पी. तिलवानी यांची होती. अनेकदा गंभीर प्रकृती असणाऱ्या रुग्णाचा रुग्णालयातच मृत्यू झाल्यास अनेकदा रुग्णाचे नातेवाईक डॉक्टरांना मारहाण करतात, रुग्णालयाची तोडफोड केली जाते. दुसरीकडे डॉक्टरच्या चुकीमुळे रुग्णाचे नुकसान झाले अथवा मृत्यू झाला, अशी तक्रार पोलिसांकडे नोंदवण्यात येते. या वेळी डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. अशी उदाहरणे घेऊन एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी तज्ज्ञांनी यातून डॉक्टर अथवा पोलीस कशाप्रकारे मार्ग काढू शकतात हे सांगितले. न्यायाधीश एस. राधाकृष्णन यांनी वैद्यकीय व्यवसायातील तत्त्व, वैद्यकीय निष्काळजीपणा आणि चुकीची वागणूक याविषयी माहिती दिली. सराफ यांनी वैद्यकीय निष्काळजीपणा, कायदेशीर बाबी याविषयी माहिती दिली. पोलिसांनी वैद्यकीय निष्काळजीपणाच्या तक्रारी आल्यास कोणत्या गोष्टींचे पालन केले पाहिजे. कोणत्या गोष्टी पोलिसांनी या वेळी लक्षात घेतल्या पाहिजेत याविषयी आयपीएस व्ही.व्ही. लक्ष्मी नारायणन यांनी मार्गदर्शन केले. एखादी तक्रार जेव्हा कोर्टासमोर येते, तेव्हा कशाप्रकारे युक्तिवाद होतो. कायद्यातील कोणत्या गोष्टींचा आधार घेतला जातो. याविषयी सर्वांना कळावे यासाठी कोर्टात केस कशी चालवतात, हे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. डॉ. पुर्विश पारेख यांनी डॉक्टरांना भेडसावणारे प्रश्न मांडले. डॉक्टर प्रॅक्टिस करत असताना कोणत्या गोष्टी केल्यास कायद्यात अडकणार नाही, याचे मार्गदर्शन या वेळी त्यांनी केले. पहिल्यांदाच अशा प्रकारच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. लवकरच दुसऱ्या परिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे डॉ. तिलवानी यांनी सांगितले. जे.जे. रुग्णालयात शनिवारी झालेल्या ‘लॉमेडिकॉन २०१५’ चे माजी न्यायाधीश एस. राधाकृष्णन, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने, रुग्णालयाचे शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. एम. बी. तायडे, केईएम रुग्णालयाचे फॉरेन्सिक विभाग प्रमुख डॉ. हरीश पाठक आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. लॉमेडिकॉन २०१५ ची संकल्पना डॉ. व्ही. पी. तिलवानी यांची होती.