जे.जे. रुग्णालयात पहिल्यांदाच ‘इंट्रा व्हॅस्कुलर लिथोट्रिप्सी’चा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 12:56 AM2020-02-28T00:56:45+5:302020-02-28T00:57:04+5:30

रक्तवाहिन्यांत ९० टक्क्यांपेक्षा जास्त अडथळे; अत्याधुनिक पद्धतीचा वापर करत वाचवले प्राण

Jj Intra-vascular lithotripsy for the first time in a hospital | जे.जे. रुग्णालयात पहिल्यांदाच ‘इंट्रा व्हॅस्कुलर लिथोट्रिप्सी’चा वापर

जे.जे. रुग्णालयात पहिल्यांदाच ‘इंट्रा व्हॅस्कुलर लिथोट्रिप्सी’चा वापर

Next

मुंबई : हृदयविकाराचा झटका आलेल्या एका ज्येष्ठ नागरिकावर जे.जे. रुग्णालयात अत्याधुनिक अशा ‘इंट्रा व्हॅस्कुलर लिथोट्रिप्सी’ पद्धतीद्वारे यशस्वी उपचार करण्यात आले. विशेष म्हणजे या रुग्णालयात पहिल्यांदाच या पद्धतीचा वापर करण्यात आला. रुग्णाच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांत ९० टक्क्यांपेक्षा जास्त अडथळे, तसेच कॅल्शिअमचे थर असल्याचे निदान झाले होते.

सेवानिवृत्त असणारे ६३ वर्षीय दिनकर गोरडे यांच्या छातीत काही दिवसांपूर्वी वेदना होत होत्या. त्यामुळे ते जे.जे. रुग्णालयाच्या हृदयरोग विभागात दाखल झाले. ईसीजीमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाले. त्वरित वैद्यकीय उपचार करून त्यांना तात्पुरत्या स्वरूपात आराम देण्यात आला. त्यानंतर ‘अँजिओग्राफी’मध्ये त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाºया रक्तवाहिन्यांत ९० टक्क्यांपेक्षा जास्त अडथळे (ब्लॉक) आढळले. तसेच रुग्णाच्या रक्तवाहिनीच्या काही कठीण भागात व आवरणात कॅल्शिअमचे थर जमा झाल्याने रक्तवाहिन्या कडक झाल्या होत्या. रुग्णाची स्थिती पाहता त्यांना बायपास शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला. पण रुग्णाची तब्येत पाहता ही शस्त्रक्रिया अतिधोक्याची ठरणार होती म्हणून रुग्ण व त्यांच्या परिवाराने अँजिओप्लास्टी करण्याचा आग्रह धरला.

याविषयी रुग्णावर उपचार करणारे सहयोगी प्राध्यापक डॉ. नागेश वाघमारे यांनी सांगितले की, लिथोट्रिप्सीमध्ये आकुंचन पावलेल्या रक्तवाहिन्या शॉक देऊन प्रसारित करण्यात येतात. माझ्यासह डॉ. लक्ष्मण गायकवाड, डॉ. महेश बोडखे, डॉ. अक्षत जैन, परिचारिका स्नेहा कदम, अरुणा सबनीस, दीपाली या चमूने सुमारे एका तासात ही प्रक्रिया पार पाडली. नव्या प्रक्रियेदरम्यान ‘आॅप्टिकल कोहोरन्स टोमोग्राफी’च्या साहाय्याने रक्तवाहिन्यांमधले होणारे बदल टिपण्यात आले.
जी रक्तवाहिनी पहिले १.८ मिमी एवढी आकुंचित झाली होती, ती या प्रक्रियेमुळे ३.३.मिमी एवढी प्रसारित झाली व रुग्णाच्या हृदयाला सुरळीतपणे रक्तपुरवठा सुरू झाला. दुसºया दिवशी गोरडे यांच्या तब्येतीत कमालीचा फरक जाणवू लागला.

लिथोट्रिप्सी म्हणजे काय?
या पद्धतीत रुग्णाच्या आकुंचन पावलेल्या रक्तवाहिन्यांमध्ये कॅथेटर टाकून फुग्याच्या साहाय्याने शॉक देऊन अडथळे दूर करण्यात येतात. ज्यामुळे रुग्णाला त्वरित व अतिशय खात्रीदायक उपचार मिळतात. परदेशात वापरत असलेली लिथोट्रिप्सी ही पद्धत भारतात फक्त खासगी रुग्णालयात वापरण्यात येते. या पद्धतीचा वापर आजपर्यंत कोणत्याही शासकीय रुग्णालयात करण्यात आला नव्हता. ही प्रक्रिया थोडीशी खर्चीक आहे. यासाठी खासगी रुग्णालयात जवळपास ८-९ लाख रुपये व शासकीय रुग्णालयात २.५ लाख रुपये एवढा खर्च येतो.

‘इंट्रा व्हॅस्कुलर लिथोट्रिप्सी’ या पद्धतीचा समावेश कोणत्याही योजनेत नाही. तसेच ही प्रक्रिया काहीशी खर्चीक असल्यामुळे सर्वच रुग्णांना या उपचार पद्धतीचा फायदा मिळवून द्यायचा असेल तर काही सामाजिक संस्थांकडून मदत मिळाल्यास ही प्रक्रिया प्रत्येकाला उपलब्ध होईल. - डॉ. नागेश वाघमारे, जे.जे. रुग्णालय

Web Title: Jj Intra-vascular lithotripsy for the first time in a hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.