जे.जे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, काम ऑगस्टपूर्वी पूर्ण न केल्यास कंत्राटदारावर कारवाई : हसन मुश्रीफ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 05:46 AM2024-07-16T05:46:42+5:302024-07-16T05:47:45+5:30

सुपर स्पेशालिटी रुग्णालय बांधकामाची मुदत गेल्यावर्षी जुलैमध्ये संपली. त्यानंतर कंत्राटदाराने वैद्यकीय शिक्षण विभागाकडून मुदत वाढवून घेतली. वस्तुत: २०२० मध्ये सुरू झालेले हे काम ३६ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित होते.

J.J. Super Specialty Hospital, action against contractor if work not completed before August says Hasan Mushrif | जे.जे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, काम ऑगस्टपूर्वी पूर्ण न केल्यास कंत्राटदारावर कारवाई : हसन मुश्रीफ

जे.जे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, काम ऑगस्टपूर्वी पूर्ण न केल्यास कंत्राटदारावर कारवाई : हसन मुश्रीफ

मुंबई : सर जे. जे. रुग्णालय परिसरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे बहुप्रतीक्षित काम जुलै महिन्यात पूर्ण होऊन ऑगस्टमध्ये ते रुग्णसेवेत रुजू होणार होते. सुपर स्पेशालिटीच्या चारपैकी किमान दोन विंग कार्यान्वित होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे देण्यात आली होती. मात्र, जुलै अर्धा संपला तरी अद्याप काम पूर्ण झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे ऑगस्टच्या आधी या रुग्णालयाचे काम न झाल्यास कंत्राटदारावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

सुपर स्पेशालिटी रुग्णालय बांधकामाची मुदत गेल्यावर्षी जुलैमध्ये संपली. त्यानंतर कंत्राटदाराने वैद्यकीय शिक्षण विभागाकडून मुदत वाढवून घेतली. वस्तुत: २०२० मध्ये सुरू झालेले हे काम ३६ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित होते. या सर्व पार्श्वभूमीवर मार्चमध्ये  वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेतली होती. त्यात कंत्राटदाराने ‘ए’, ‘बी’, ‘सी’ आणि ‘डी’ या विभागांपैकी पहिल्या दोन विभागांचे काम जुलैच्या अखेरीस पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. तसेच बांधकाम पूर्ण झालेल्या दोन विभागांचे कामकाज ऑगस्टमध्ये सुरू होईल, असेही त्या बैठकीत सांगितले होते.

विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कंत्राटदाराने जुलैमध्ये दोन विंगचे काम पूर्ण करून देण्याची ग्वाही दिली होती. मात्र, सध्याच्या कामाचे स्वरूप बघून वाटत नाही, हे काम जुलैमध्ये पूर्ण होईल. याबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री अंतिम निर्णय घेणार आहेत. 

सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या बांधकामाचा दर महिन्याला आढावा घेत आहोत. येत्या गुरुवारीही आढावा घेऊन पुढे काय करायचे ते ठरवणार आहे. यापूर्वीच्या बैठकीत कंत्राटदाराने पहिल्या दोन विंगचे काम हे जुलैच्या अखेरीस पूर्ण करण्याचा शब्द दिला होता. रुग्णालय ऑगस्टपूर्वी सुरू होणार नसेल तर कंत्राटदारावर कारवाई करण्याशिवाय पर्याय नसेल.

- हसन मुश्रीफ,

मंत्री, वैद्यकीय शिक्षण विभाग

असे असेल सुपर स्पेशालिटी रुग्णालय

      दोन मजली तळघरासह तळमजला अधिक दहा मजल्यांची इमारत, प्रत्येक मजला एक लाख चौरस फुटांचा.

      रुग्णालयाच्या इमारतीत हृदय शस्त्रक्रिया विभाग, न्यूरो सर्जरी विभाग, हेमॅटॉलॉजी विभाग, रुमॅटॉलॉजी विभाग, किडनी विकार विभाग, एंडोक्रायनोलॉजी विभाग, कॅन्सर शस्त्रक्रिया विभाग, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी, अत्याधुनिक व्हीआयपी वॉर्ड, तसेच वैद्यकीय विभागात नवीन अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स, वॉर्ड उभारण्यात येईल.

      सध्या जे.जे. रुग्णालयाची १,३५० खाटांची क्षमता असून नव्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात आणखी एक हजार खाटा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुग्णालय पूर्ण झाल्यानंतर खाटांची संख्या २,३५० होईल.

Web Title: J.J. Super Specialty Hospital, action against contractor if work not completed before August says Hasan Mushrif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.