जे.जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे काम दोन महिन्यांनंतर सुरूहोणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 05:56 AM2019-02-07T05:56:14+5:302019-02-07T05:57:01+5:30
सर जे.जे. समूह रुग्णालयाच्या अधिपत्याखाली होणारे जे.जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे काम दोन महिन्यांत सुरू होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित असणाऱ्या या प्रकल्पाला मंगळवारी राज्य शासनाने हिरवा कंदील दिला आहे.
मुंबई - सर जे.जे. समूह रुग्णालयाच्या अधिपत्याखाली होणारे जे.जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे काम दोन महिन्यांत सुरू होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित असणाऱ्या या प्रकल्पाला मंगळवारी राज्य शासनाने हिरवा कंदील दिला आहे. या प्रकल्पाला राज्य शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली असून निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.
जे.जे. रुग्णालयाच्या आवारातील एकूण ४२ एकर भूखंडाच्या आवारात अतिविशेषोपचार रुग्णालयाची बहुमजली इमारत, वसतिगृह, अधिकारी - कर्मचारी निवासस्थाने इ. बांधकामासाठी मान्यता मिळाली आहे. याकरिता ४७९ कोटी ९५ लाख १६ हजार ७२४ एवढ्या निधीचे अंदाजपत्रक काढले आहे. रुग्णालयातील अत्याधुनिक यंत्रसामग्रीसाठी अंदाजे १५० कोटी तर मनुष्यबळासाठी दरवर्षी १९ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
राज्य शासनाला या प्रकल्पाकरिता वैद्यकीय शिक्षण व संचालनालयाने ६५९ कोटी १४ लाख ८८ हजार ५१८ एवढा निधी प्रस्तावित केला होता. तर सार्वजनिक बांधकाम विभाग व सचिव समितीने प्रस्तावित केलेल्या तब्बल ७७८ कोटी ६५ लाख २० हजार एवढ्या रकमेला मान्यता दिली आहे. याविषयी सर जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितले की, प्रशासकीय मान्यतेमुळे आता या प्रकल्पाला गती येणार आहे.
जे.जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारणे हे दिवास्वप्न आहे. आता प्रशासकीय मान्यतेनंतर रुग्णालयाचा आराखडा तयार करण्यात येईल. निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी लागेल, त्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल.
- डॉ. तात्याराव लहाने, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय