Join us  

‘जे.जे. सुपर स्पेशालिटी’चा निर्णय बांधकाम विभागाकडे,  किती मुदतवाढ द्यायची याबद्दल वैद्यकीय शिक्षण विभागाची भूमिका स्पष्ट

By संतोष आंधळे | Published: August 27, 2023 2:25 AM

रुग्णालयाचे काम संबंधित कंत्राटदाराला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दिले आहे. त्या अधिकाऱ्यांसोबत नुकतीच आम्ही बैठक घेतली.

- संतोष आंधळे 

मुंबई :  सर जे. जे. रुग्णालयाच्या परिसरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या बांधकामाची मुदत जुलै महिन्यात संपली असून आतापर्यंत फक्त २५ टक्केच काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे ज्या कंपनीला रुग्णालय बांधण्याचे काम देण्यात आले होते, त्या कंपनी संबंधात पुढे काय करायचे? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र याप्रकरणी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्या कंपनीला किती मुदतवाढ द्यायची, हा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभाग घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

गेली अनेक वर्षे जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्याबाबत हालचाली सुरू होत्या. मात्र, रुग्णालयाचे अद्यापही फारसे काम न झाल्याने ते कधी पूर्ण होणार याची जोरदार चर्चा रुग्णालयात परिसरात आहे. एका खासगी कंत्राटदाराला हे काम जुलै २०२० मध्ये देण्यात आले. त्याने हे काम ३६ महिन्यांत पूर्ण करून देणे अपेक्षित होते. मात्र, त्यांना दिलेली कामाची मुदत संपली आहे. मे महिन्यात वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जे. जे. रुग्णालयाला भेट देऊन या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या बांधकामाची पाहणी केली होती. सध्या जे. जे. रुग्णालयांची १,३५० खाटांची संख्या असून नव्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात अजून एक हजार खाटा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या खाटांची संख्या २,३५० होणार आहे.

रुग्णालयाचे काम संबंधित कंत्राटदाराला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दिले आहे. त्या अधिकाऱ्यांसोबत नुकतीच आम्ही बैठक घेतली. कोरोना काळातील सूट म्हणून मुदतवाढ मिळावी यावी, असे कंत्राटदाराने सांगितले. यानंतर आम्ही आता असे ठरविले आहे की, सार्वजनिक बांधकाम विभागाने या इमारतीच्या बाबतीत निर्णय घ्यावा आणि लवकरात लवकर ती इमारत पूर्ण करून द्यावी.     - हसन मुश्रीफ,    मंत्री, वैद्यकीय शिक्षण विभाग

टॅग्स :मुंबईहॉस्पिटल