जे.जे. मार्ग पोलीस सन्मानित

By admin | Published: June 23, 2017 01:29 AM2017-06-23T01:29:33+5:302017-06-23T01:29:33+5:30

दिवंगत आयपीएस अधिकारी दीपक जोग यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा २०१६चा दीपक जोग पुरस्कार गुरुवारी निवृत्त पोलीस महासंचालक ज्युलियन रिबेरो

J.J. The way the police honored | जे.जे. मार्ग पोलीस सन्मानित

जे.जे. मार्ग पोलीस सन्मानित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दिवंगत आयपीएस अधिकारी दीपक जोग यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा २०१६चा दीपक जोग पुरस्कार गुरुवारी निवृत्त पोलीस महासंचालक ज्युलियन रिबेरो यांच्या हस्ते जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याच्या पथकाला देण्यात आला. या वेळी पोलीस दलाला कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांची गरज असून, हा पुरस्कार त्यांच्या कामाला उत्तेजन देणारा असल्याचे मत रिबेरो यांनी व्यक्त केले.
आझाद मैदान येथील मुंबई पोलीस क्लबच्या सभागृहात गुरुवारी सायंकाळी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, दीपक जोग यांच्या पत्नी प्रेरणा, मुलगा कौस्तुभ यांच्यासह मुंबई पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार आणि राज्य पोलीस दलातील माजी अधिकारी उपस्थित होते. १९८५च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या दीपक जोग यांनी नाशिक, भुसावळ, बुलढाणा, जळगावसह मुंबई पोलीस दलात चांगली कामगिरी बजावली होती. ९ नोव्हेंबर १९९६ रोजी वयाच्या अवघ्या ३६व्या वर्षी त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे वडील माजी पोलीस महासंचालक सूर्यकांत जोग यांनी १९९७ साली दीपक जोग मेमोरियल संस्था स्थापन केली. या संस्थेतर्फे पोलीस दलात उत्कृष्टरीत्या गुन्ह्याची उकल करणाऱ्या पोलीस पथकाला ‘बेस्ट डिटेक्शन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. १९९७पासून सुरू झालेल्या या पुरस्कारामध्ये २०११ साली पत्रकार जे. डे यांच्या हत्येच्या गुन्ह्याची उकल करणाऱ्या पथकाला शेवटचा पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर गेली पाच वर्षे हा पुरस्कार देण्यात आला नव्हता. पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी पुन्हा हा पुरस्कार सुरू केला आहे.
५ डिसेंबरला डंकन रोडवरील सरबतवाला इमारतीमध्ये राहणाऱ्या जुनेरा खान या अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीचे खंडणीसाठी अपहरण करून तिची हत्या करण्यात आली होती. जे.जे. मार्ग पोलिसांनी कुठलाही पुरावा हाती नसताना शिताफीने या गुन्ह्याची उकल करीत दोन अल्पवयीन मुलांना अटक केली. या कामगिरीसाठी जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याच्या पथकाला रिबेरो यांच्या हस्ते २०१६ सालचा दीपक जोग बेस्ट डिटेक्शनचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ठाण्यातील गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर आणि पोलीस उपनिरीक्षक धीरज भालेराव यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तसेच त्यांना तपासात मदत केलेले पोलीस शिपाई दीपक पाटील, भरत जाधव, डोंगरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार जमिल मेहबुब सय्यद, पोलीस शिपाई इम्रान मुल्ला यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला.
या वेळी रिबेरो यांनी पुरस्कार पुन्हा सुरू केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. सूर्यकांत जोग यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच दीपक जोग यांच्या प्रामाणिक कामाबाबत कौतुक केले. जोग यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांची पोलीस दलाला गरज असून, हा पुरस्कार अशा अधिकाऱ्यांच्या कामाला वाव देणारा असल्याचे मत रिबेरो यांनी या वेळी व्यक्त केले.
पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनीही जोग यांच्या आठवणींची शिदोरी सर्वांसमोर मांडली. मुंबईत आलो तेव्हा दीपकसारखा मित्र मिळाला. दीपक हा मित्र नसून माझ्यासाठी चांगला मार्गदर्शक ठरला. त्याचे व्यक्तिमत्त्व परिपूर्ण होते. जोग यांच्या सन्मानार्थ देण्यात येणारा हा पुरस्कार त्यांच्या स्मृतींना न्याय मिळवून देईल. माझ्या मुलाला शाळेमध्ये असताना दीपक जोग यांच्या हस्ते मिळालेल्या बक्षिसाचा फोटो माझा सर्वांत आवडता फोटो आहे,’ असे आयुक्त पडसलगीकर यांनी या वेळी बोलताना सांगितले.

Web Title: J.J. The way the police honored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.