मुंबई : वैद्यकीय रुग्णालयांना लागणारी औषधे आणि यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी गेल्या काही वर्षांत फारसा निधी प्राप्त झाला नसला तरी सध्याच्या घडीला वैद्यकीय शिक्षण विभागाने विविध रुग्णालयांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून जे. जे. रुग्णालयातील विविध वैद्यकीय विभागांतील यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी नुकतीच ४३ कोटींची मान्यता दिली आहे.
जे. जे. रुग्णालयाच्या विविध विभागांतील यंत्रसामग्रींसाठी निधी मंजूर झाला आहे. त्यात जनरल सर्जरी व गायनॅकॉलॉजी विभागाला १४ कोटी रुपये खर्च करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, तर न्यूरोसर्जरी विभागासाठी १४ कोटी रुपये देण्यात आले आहेत. तसेच प्लास्टिक सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी आणि ऑर्थोपेडिक विभागासाठी १४ कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे.
यामुळे होतात रद्द शस्त्रक्रिया
शस्त्रक्रिया करण्यासाठी उपकरणे चालत नसल्यामुळे किंवा उपलब्ध नसल्याने काही वेळा शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या वा रद्द केल्या जातात. त्यामुळे आता हा निधी मंजूर झाल्याने रुग्णालयात नवीन उपकरणे येतील, त्यांचा फायदा सर्जरीसाठी केला जाईल, अशी आशा आहे. ज्या औषध आणि यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या वैद्यकीय प्राधिकरणाने हा निधी खर्च करून तत्काळ उपकरणे रुग्णालयाला मिळवून द्यावी, असे मत वरिष्ठ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.