मुंबई : एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना पहिल्याच वर्षी शरीररचना शास्त्र विषयांतर्गत शरीर विच्छेदन शिकविले जाते. विद्यार्थ्यांचा वैद्यकीय शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी हा विषय महत्त्वाचा मानला जातो. हा विषय आधुनिक पद्धतीने शिकविण्यासाठी जेजे रुग्णालयाशी संलग्न ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये पहिले व्हर्च्युअल डिसेक्शन टेबल खरेदी करण्याच्या २ कोटी ७७ लाख रुपयांच्या खर्चास वैद्यकीय शिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रम शिकण्यासाठी शरीररचना शास्त्र विषयाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना मृतदेहावर शरीर विच्छेदन शिकणे बंधनकारक आहे. यासाठी बहुतांश वैद्यकीय महाविद्यलयात बेवारस मृतदेह किंवा कॉलेजला देहदान केलेल्या मृतदेहावर विद्यार्थ्यांना शिकविले जाते.
शरीर विच्छेदन शिकविताना एका मृतदेहाचा त्याच्या केसापासून ते पायाच्या बोटापर्यंतचा वापर केला जातो. त्यामध्ये शरीराची रचना कशा पद्धतीने असते. रक्तवाहिन्या कशा पद्धतीने असतात. अगदी बारीक बारीक गोष्टी त्यांना या विषयात शिकविल्या जातात. त्याचा विद्यार्थ्यांना पुढे भविष्यात प्रॅक्टिस करताना मोठ्या प्रमाणात फायदा होतो. तसेच, शरीरावर कट कशा पद्धतीने घेतला जातो. त्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या शिकविल्या जातात. एका मृदेहावर १० ते १५ विद्यार्थी शिक्षण घेत असतात. त्या मृतदेहावर विद्यार्थी वर्षभर शिकत असतात.
शवविच्छेदनाला व्हर्च्युअल डिसेक्शन टेबल हा पर्याय नसून मात्र ती अतिरिक्त सुविधा आहे. कारण मृदेहावर शिकताना जो स्पर्श, जे शिकता येते ते व्हर्च्युअलवर मिळणार नाही. मात्र, त्या मृतदेहावरील ज्या गोष्टी जितक्या बारकाईने दिसत नाही, त्यापेक्षा अधिक बारकाईने या व्हर्चुअल डिसेक्शनवर विद्यार्थ्यांना पाहता येतात. अनेकद विद्यार्थ्यांना एकाच वेळी या टेबलच्या माधयमातून अनेक गोष्टी शिकविणे शक्य होणार आहे. तसेच, इतर विभागातील तसेच मृदेहावर थेट शिकण्याआधी विद्यार्थी अनेक गोष्टी या व्हर्च्युअल डिसेक्शन टेबलवर शिकू शकतात. त्यामुळे त्याच्या ज्ञानात अधिक भर पडू शकेल. ज्या कॉलेजमध्ये मृतदेह कमी प्रमाणात उपलब्ध होतात तिथे या टेबलचा फायदा होईल. - डॉ. दीपक जोशी, शरीररचना शास्त्र विभागप्रमुख, ग्रँट मेडिकल कॉलेज, जेजे रुग्णालय.