Join us

'जेजे'चे डॉ. महेंद्र कुरा सक्तीच्या रजेवर; वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांचे आदेश

By संतोष आंधळे | Published: December 20, 2023 11:20 AM

जे. जे. रुग्णालयातील त्वचारोग विभागप्रमुख डॉ. महेंद्र कुरा यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून दोन दिवसांपासून २१ निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर गेले आहेत.

संतोष आंधळे

मुंबई : जे. जे. रुग्णालयातील त्वचारोग विभागप्रमुख डॉ. महेंद्र कुरा यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून दोन दिवसांपासून २१ निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर गेले आहेत. तसेच या निवासी डॉक्टरांच्या आंदोलनाला जे जे निवासी डॉक्टर संघटनेने पाठींबा दर्शविला आहे. याप्रकरणाची  दखल घेऊन  राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्वचारोग विभागप्रमुख डॉ. महेंद्र कुरा यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश विभागाला दिली असल्याची माहिती लोकमतशी बोलताना दिली.  

गेल्या काही दिवसांपासून त्वचारोग विभागप्रमुख डॉ. महेंद्र कुरा आणि त्या विभागात काम करणारे निवासी डॉक्टर यांच्यात संघर्ष सुरू आहे. या प्रकरणात विभागातील सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक निवासी डॉक्टरांच्या सोबत आहेत. निवासी डॉक्टरांनी या प्रकरणी दखल घ्यावी म्हणून रुग्णालयाच्या प्रशासनाला  ९ डिसेंबर रोजी पत्र लिहिले होते. रुग्णालय प्रशासन आणि वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने या घटनेची गंभीर दखल घेऊन चौकशी समिती नेमली. त्यामध्ये संचालनालयाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले आणि ससून वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांचा समावेश आहे.

दरम्यान, या प्रकरणी मंगळवारी  वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने नेमलेल्या चौकशी समितीने त्यांचा वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त यांना सादर केला होता. डॉ. कुरा यांना पदावरून काढण्यासाठी निवासी डॉक्टरांनी रुग्णालय परिसरातच आंदोलन सुरू केले आहे. आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांची मागणी दोन दिवसांत पूर्ण न केल्यास जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टर संघटना (मार्ड) या आंदोलनात सहभागी होईल, असे पत्र रुग्णालय प्रशासनाला देण्यात आले आहे.

कारवाई अगोदरच डॉ कुरा रजेवरमंगळवारी चौकशी समितीयाचा अहवाल सादर करण्यापूर्वी डॉ कुरा यांनी जे जे रुग्णालय प्रशासनाला पत्र लिहून वैयक्तिक कामासाठी १५ दिवसाची रजा हवी असल्याचा अर्ज केला होता.

मुश्रीफ यांनी सांगितले कि, " या प्रकरणाची दखल घेत आम्ही दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी समिती केली होती. त्यांचा अहवाल आला आहे. त्यानुसार मी आमच्या विभागाला संबंधित त्वचा रोग विभाग प्रमुखांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश विभागाला दिले आहे. तसेच अधिवेशन संपल्यानंतर आम्ही निवासी डॉक्टरांशी या आणि त्यांच्या विविध विषयांवर बोलणार आहे. "  

निवासी डॉक्टर आंदोलनाच्या मुद्द्यावर कायम

जे जे निवासी डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ शुभम सोहनी यांनी सांगितले कि, " आमची मागणी त्यांना रजेवर पाठविण्याची नसून त्यांना जे जे रुग्णालयातच ठेवू नये अशी आहे. कारण पुन्हा ते रजेवरून आल्यावर पूर्वीसारखाच त्रास देऊ शकतात. कारण या विभागातील निवासी डॉक्टरांना त्यांची भीती वाटत आहे.त्यामुळे त्यांना जो पर्यंत रुग्णलयातून काढत तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरु राहणार आहे. जर आज कारवाई झाली नाही तर  जे जे रुग्णालयातील सर्व विभागातील निवासी डॉक्टर बेमुदत संपावर  जाणार आहे. त्या संदर्भातील पत्र रुग्णालय प्रशासनाला दिले आहे. याप्रकरणी डॉ महेंद्र कुरा यांना वारंवार  संपर्क करूनही त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :जे. जे. रुग्णालयहसन मुश्रीफ