मुंबई: जेजे रुग्णालयातील त्वचारोग विभागातील २१ डॉक्टर नऊ दिवस सामूहिक रजेवर आहेत. त्वचारोग विभाग प्रमुखांच्या मनमानी कारभाराविरोधात या डॉक्टरांनी रजेवर जाण्याचा मार्ग निवडला आहे. यासंदर्भात मंगळवारी निवासी डॉक्टर आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यात बैठक झाली. मात्र कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने या डॉक्टरांनी सामूहिक रजेवर कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे निवासी डॉक्टरांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असून रुग्ण तपासणीचा सर्व भार हा अध्यापक मंडळींवर आहे.
दरम्यान, त्वचा विकार विभागातील डॉक्टरांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही, तर जेजे निवासी डॉक्टर संघटनेने २८ पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा रुग्णालय प्रशासनाला दिला आहे. त्या संदर्भातील तसे पत्र सुद्धा त्यांनी रुग्णालयाला दिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्वचारोग विभागप्रमुख डॉ. महेंद्र कुरा आणि त्या विभागात काम करणारे निवासी डॉक्टर यांच्यात संघर्ष सुरू आहे. या प्रकरणात विभागातील सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक निवासी डॉक्टरांसोबत आहेत. या प्रकरणाची रुग्णालय प्रशासन, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने दखल घेऊन चौकशी समिती नेमली होती. त्यात वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले आणि ससून वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांचा समावेश होता. याप्रकरणी आठडाभरापूर्वी चौकशी समितीने त्यांचा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांना सादर केला आहे. त्यानंतर शासनाने डॉ. कुरा यांना सक्तीच्या रजेवर पाठविले होते.
या सामूहिक रजेवर असलेल्या निवासी डॉक्टर अभिजित हेलगे यांनी सांगितले, जोपर्यंत डॉ. कुरा यांना जे जेजे रुग्णालयातून हटविण्यात येणार नाही, तोपर्यंत आमचे सामूहिक रजा आंदोलन सुरूच राहणार आहे. १८ दिवसापूर्वी आम्ही प्रशासनाला कळविले होते. आज आमच्या सामूहिक रजा आंदोलनाचा नववा दिवस आहे. मंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. कारवाई करू, असे सांगितले, पण कधी करणार, काय करणार याबाबत काही सांगितले नाही. त्यामुळे आम्ही आमच्या आंदोलनावर कायम आहोत.