कंटेनर हाताळणीत जेएनपीटी बंदर अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:07 AM2021-09-09T04:07:03+5:302021-09-09T04:07:03+5:30
मुंबई : सागरी व्यापारी मालवाहतुकीत आघाडीवर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने (जेएनपीटी) कंटेनर हाताळणीत आपले अव्वल स्थान कायम राखले ...
मुंबई : सागरी व्यापारी मालवाहतुकीत आघाडीवर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने (जेएनपीटी) कंटेनर हाताळणीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. ऑगस्ट महिन्यात या बंदराने तब्बल ४ लाख ५३ हजार १०५ टीईयू कंटेनर वाहतूक हाताळली. ऑगस्ट २०२० च्या तुलनेत त्यात २८.४५ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. न्हावा-शेवा इंटरनॅशनल कंटेनर स्थापनेनंतरची ही सर्वाधिक वाढ आहे.
२०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत जेएनपीटी बंदराने २२ लाख ५० हजार ९४३ टीईयू कंटेनर वाहतूक हाताळली. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत त्यात ४५.७० टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी १५ लाख ४४ हजार ९०० टीईयू कंटेनर वाहतुकीची नोंद करण्यात आली होती. ऑगस्ट महिन्यात ५०० रेल्वे रॅकच्या माध्यमातून ७९ हजार ५८३ टीईयूआईसीडी मालवाहतूक करण्यात आली. चालू वर्षात (एप्रिल ते ऑगस्ट) बंदराच्या कामकाजात रेल्वेचा वाटा १९.२७ टक्के राहिला. जेएनपीटी बंदरात रेल्वेच्या एकूण कामगिरीत सुधारणा होण्यामध्ये रेल्वे आणि सर्व पोर्ट टर्मिनल्ससह सर्वभागधारकांची कार्यक्षमता आणि समन्वय, सर्व कंटेनर ट्रेनऑपरेटर यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याची माहिती देण्यात आली.
गेल्या महिनाभरात शाश्वत व हरित बंदर उपक्रमांतर्गत जेएनपीटीने अनेक महत्त्वाचे उपक्रम राबविले. नऊ विद्युत वाहने तैनात करण्यात आली असून, बंदराच्या प्रचालन क्षेत्रामध्ये एक समर्पित चार्जिंग स्टेशन सुरू केले आहे. शिवाय घनकचरा व्यवस्थापन संयंत्रात बायोगॅसवर आधारित वीजनिर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. त्याचबरोबर बंदर परिसरातील हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करण्यासाठी यंत्रणा उभारली आहे. बंदराची जोडणी सक्षम व सुगम करण्यासाठी ‘एलएचएस- लेन आरओबी’चा दुसरा टप्पा आणि ‘जेएनसीएच-पीयूबी’च्या मागच्या बाजूकडील रस्त्यासह अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत.
.......
कोरोना संकटात आम्ही जगभरातून मदत स्वरूपात आलेल्या वैद्यकीय सामग्रीच्या हाताळणीस सर्वोच्च प्राधान्य दिले. मालवाहतूक अखंड सुरू ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यामुळेच आमच्या कामगिरीचा आलेख सातत्याने वाढत आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये तर यशाचे नवे शिखर गाठले आहे.
- संजय सेठी, अध्यक्ष, जेएनपीटी