मुंबई : जेएनपीटीत आयात, निर्यातीसाठी येणाऱ्या कंटेनर्सचा मार्ग कमीतकमी वेळात मोकळा व्हावा यासाठी डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरी (डीपीडी), डायरेक्ट पोर्ट एन्ट्री (डीपीई), इंटर टर्मिनल मुव्हमेंट (आयटीटी) या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या वर्षी बंदरात ज्या कामांसाठी ५५ तास लागायचे ते काम आता ३३ तासांत पूर्ण होत आहे. रस्त्यांवरून होणाºया मालवाहतुकीचा कालावधी ३३ टक्क्यांनी तर रेल्वे प्रवासाचा कालावधी ४५ टक्क्यांनी कमी झाला आहे. त्यातून केवळ वेळच नाही, तर आर्थिक आघाडीवरील बचतही साध्य झाल्याची माहिती जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी दिली.भारतातील आघाडीचा कंटेनर पोर्ट असलेल्या जेएनपीटीच्या मुंबई येथील कार्यालयात नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत संजय सेठी यांनी अशा विविध अभिनव योजनांबाबतची माहिती दिली. जागतिक बँकेच्या ईझ आॅफ डुर्इंग बिझनेस इंडेक्समधील ट्रेडिंग अॅक्रॉस द बॉर्डर या विभागात भारताचे नामांकन १४६ वरून ८६ व्या क्रमांकावर झेपावले आहे. त्यात जेएनपीटीचे मोठे योगदान आहे. सध्या बंदरात मध्यवर्ती पार्किंग प्लाझाचे काम सुरू आहे. त्यामुळे निर्यातीसाठी येणाºया कंटेनर्सना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता एकाच ठिकाणाहून करणे शक्य होईल. हे पार्किंगचे क्षेत्र ४५ हेक्टर एवढे असून त्यावर १५३८ कंटेनर्स उभे राहू शकतील. त्यामुळे जेएनपीटीकडे येणाºया रस्त्यांवरील अवैध पार्किंग बंद होईल आणि रस्ते वाहतुकीसाठी मोकळे राहतील, असेही सेठी यांनी सांगितले.रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशनमुळे बंदरात कंटेनर्सना प्रवेशासाठी लागणारा कालावधी १० मिनिटांवरून एका मिनिटावर आला आहे. भारतात प्रथमच कंटेनर ट्रॅकिंग, ई-डिलिव्हरी, मोबाइल अॅप ही यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. याशिवाय जेएनपीटीने झिंका लॉजिस्टिक सोल्युशन्स (ब्लॅकबग) या कंपनीच्या सहकार्याने ई मार्केट मंच सुरू केला आहे. त्यामुळे जेएनपीटीतून रिकाम्या कंटेनर्सच्या वाहतुकीचे प्रमाण कमी होईल, अशी आशा सेठी यांनी व्यक्त केली. पायाभूत सुविधांतील सुधारणेमुळे हे यश प्राप्त झाल्याचे त्यांनी नमूद केले.
जेएनपीटीत आयात-निर्यातीच्या कालावधीसह खर्च घटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2020 6:07 AM