Join us

मालवाहतुकीत ‘जेएनपीटी’ पुन्हा अव्वल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 4:06 AM

मुंबई : देशातील प्रमुख १२ बंदरांच्या शर्यतीत जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) आणि चेन्नई बंदराने आपले अव्वल स्थान कायम ...

मुंबई : देशातील प्रमुख १२ बंदरांच्या शर्यतीत जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) आणि चेन्नई बंदराने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये या दोन्ही बंदरांवरील मालवाहतुकीत जवळपास ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

एप्रिलमध्ये जेएनपीटीने ६ हजार ३२५ मेट्रिक टन माल हाताळला, तर मार्चमध्ये येथून ३ हजार ९५६ मेट्रिक टन मालवाहतूक करण्यात आली होती. मुंबई बंदरातून होणाऱ्या मालवाहतुकीतही काहीशी वाढ नोंदविण्यात आली आहे. मार्चमध्ये मुंबईतून ४ हजार ८७ मेट्रिक टन मालवाहतूक झाली, तर एप्रिल महिन्यात त्यात १४.४० टक्क्यांची (४ हजार ६७७ मेट्रिक टन) वाढ झाली.

देशातील प्रमुख १२ बंदरांवरून एप्रिमध्ये ६१ हजार ५२७ टन मालवाहतूक करण्यात आली. मार्चच्या तुलनेत त्यात २८.७० टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. चेन्नई (६०.२० टक्के), कामगार पोर्ट (५३.५० टक्के) आणि गोव्यातील मुरगाव (५१.६० टक्के) बंदराने एप्रिल महिन्यात ५० टक्क्यांहून अधिक अतिरिक्त माल हाताळला. बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

१२ प्रमुख बंदरांवरून झालेली मालवाहतूक

माल संख्या (मेट्रिक टन) वाढ

कच्चे तेल ११,५४६ ११.१० टक्के

नैसर्गिक वायू १,१७३ ४.७० टक्के

लोखंड ६,५०८ ९०.४० टक्के

औष्णिक कोळसा ८,३२१ ४.९० टक्के

..................

कारणे काय?

फेब्रुवारीमध्ये कोरोना आटोक्यात येत असल्याचे चित्र निर्माण झाल्याने बहुतांश कंपन्यांनी पूर्णक्षमतेने उत्पादन सुरू केले. उत्पादनात वाढ झाल्याने साहजिकच मालवाहतुकीला गती मिळाली. मार्चनंतर भारतात आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवू लागल्याने विविध देशांकडून सुरू झालेला मदतीच्या ओघ, हंगामी फळांची वाहतूक आदी कारणांमुळे जेएनपीटी बंदरातील मालवाहतुकीचा आकडा वाढल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.