मुंबई - जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं होतं. मात्र गेट वे ऑफ इंडियावरुन आझाद मैदानात आंदोलकांची रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर आता दोन तासांनी आझाद मैदानातील विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे घेण्यात आले आहे. जेएनयू हल्ल्याविरोधात सुरू असलेल्या आझाद मैदानातील आंदोलन मागे घेण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे. 'गेटवेवर आम्ही कुणालाही त्रास न देता आंदोलन करत असतानाही पोलिसांनी आम्हाला आझाद मैदानात आणलं. हजारो विद्यार्थ्यांनी हे आंदोलन यशस्वी करून दाखलं आहे. गेटवेवरील आंदोलन आम्ही मागे घेत आहोत, पण आमचा लढा यापुढेही असाच सुरू राहील' अशी माहिती आंदोलक विद्यार्थी कपिल अग्रवाल याने दिली आहे.
गेटवे परिसरात जेएनयू हल्ल्याचा जोरदार निषेध करण्यात आला होता. पोलिसांनी आंदोलकांना आझाद मैदानात जाण्याची सूचना केली होती. मात्र आंदोलक गेट वे ऑफ इंडियावरच ठाण मांडून होते. परिसरात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तसेच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची रवानगी ही आझाद मैदानात करण्यात आली होती. आझाद मैदानात जाण्यासाठी आंदोलकांनी विरोध केला होता. गेट वे ऑफ इंडियावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलेलं नाही, आझाद मैदानात त्यांची रवानगी केल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.
जेएनयूवरील हल्ल्याच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या या आंदोलनात छात्र भारती, जॅक मुंबई आणि इतर सर्व पुरोगामी संघटना, टीस, टीआयएफआर, मुंबई विद्यापीठ या शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थ्यांसह मिठीबाई, सेंट झेविअर्स, रूपारेल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात सामान्य आणि स्थानिक नागरिकांनीही आपला सहभाग दर्शवत या भ्याड हल्ल्याचा निषेध केला.
देशात आतापर्यंत एनआरसी, सीएएविरोधात ज्या ज्या विद्यार्थ्यांनी, समाज सुधारकांनी आंदोलने केली आणि त्यांना अटक करण्यात आली; त्यांची सुटका करावी, अशी मागणीही यादरम्यान करण्यात आली. या मागण्यांप्रमाणे या हल्ल्यामागे जबाबदार असलेले तेथील चिफ सेक्रेटरी, चिफ प्रॉक्टर, कुलगुरू आणि अमित शहा यांची चौकशी व्हावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी संध्याकाळी माक्सधारी तरुणांनी हिंसाचार घडवला. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी ५० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. हिंदू रक्षा दलानं या हिंसाचाराची जबाबदारी स्वीकारली आहे. हिंदू रक्षा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भूपेंद्र कुमार तोमर उर्फ पिंकी चौधरींनी सोमवारी रात्री याबद्दलचा व्हिडीओ व्हायरल केला आहे.
भूपेंद्र कुमार तोमर यांनी व्हायरल केलेला व्हिडीओ १ मिनिट ५८ सेकंदांचा आहे. हिंदू रक्षा दल देशविरोधी कारवाया सहन करणार नाही, असा थेट इशारा त्यांनी व्हिडीओतून दिला आहे. 'देशविरोधी कारवाया करणाऱ्यांना रविवारी संध्याकाळी ज्या पद्धतीनं उत्तर देण्यात येईल, तशाच प्रकारे उत्तर दिलं जाईल. आमच्याच कार्यकर्त्यांनी जेएनयूमधील विद्यार्थी आणि शिक्षकांना मारहाण केली. धर्माच्या विरोधातील विधानं आम्ही सहन करणार नाही,' असं तोमर म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
JNU Attack: 'या' संघटनेनं स्वीकारली जेएनयूतील हिंसाचाराची जबाबदारी
JNU Attack : गेटवेवरील आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; आझाद मैदानात रवानगी
JNU Attack: 'बुरखा घालून काळोखात हल्ले करणं म्हणजे मर्दानगी नाही'
अमित शाहांचा विरोध करण्यासाठी एक लाख कार्यकर्त्यांद्वारे 35 KMची 'काळी भिंत'!