Join us

JNU Attack : गेटवेवरील आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; आझाद मैदानात रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 7:58 AM

जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच आहे.

ठळक मुद्देजेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच आहे.पोलिसांनी आंदोलकांना आझाद मैदानात जाण्याची सूचना केली.आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची रवानगी ही आझाद मैदानात करण्यात आली.

मुंबई - दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत. रविवारी (5 जानेवारी) विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. जेएनयूवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील विविध संघटना, विद्यार्थी आणि सामान्य नागरिक गेट वे ऑफ इंडियाजवळ एकत्र जमले आणि त्यांनी हल्ल्याच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने केली आहेत. 

जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच आहे. गेटवे परिसरात हल्ल्याचा जोरदार निषेध करण्यात येत आहे. पोलिसांनी आंदोलकांना आझाद मैदानात जाण्याची सूचना केली. मात्र आंदोलक गेट वे ऑफ इंडियावरच ठाण मांडून होते. परिसरात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची रवानगी ही आझाद मैदानात करण्यात आली आहे. आझाद मैदानात जाण्यासाठी आंदोलकांनी विरोध केला आहे. गेट वे ऑफ इंडियावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलेलं नाही, आझाद मैदानात त्यांची रवानगी केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

जेएनयूवरील हल्ल्याच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या या आंदोलनात छात्र भारती, जॅक मुंबई आणि इतर सर्व पुरोगामी संघटना, टीस, टीआयएफआर, मुंबई विद्यापीठ या शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थ्यांसह मिठीबाई, सेंट झेविअर्स, रूपारेल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात सामान्य आणि स्थानिक नागरिकांनीही आपला सहभाग दर्शवत या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. देशात आतापर्यंत एनआरसी, सीएएविरोधात ज्या ज्या विद्यार्थ्यांनी, समाज सुधारकांनी आंदोलने केली आणि त्यांना अटक करण्यात आली; त्यांची सुटका करावी, अशी मागणीही यादरम्यान करण्यात आली. या मागण्यांप्रमाणे या हल्ल्यामागे जबाबदार असलेले तेथील चिफ सेक्रेटरी, चिफ प्रॉक्टर, कुलगुरू आणि अमित शहा यांची चौकशी व्हावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

अभाविपचे विद्यार्थी हुतात्मा चौकात

हुतात्मा चौक परिसरात सोमवारी रात्री जेएनयूमधील हल्ल्याच्या निषधार्थ अभाविपतर्फे आंदोलन करण्यात आले. तसेच संघटनेच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी सकाळी माटुंगा येथील रुईया महाविद्यालयाबाहेर आंदोलन केले. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथेच आंदोलन करणार असल्याचे मुंबई जिल्हा संघटन मंत्री सूरज लोकरे यांनी सांगितले.

वकील आणि डॉक्टरांचाही सहभाग

या निषेधाला सामान्य नागरिकांसह मोठे वकील, डॉक्टर्स यांनीही उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवित आम्ही विद्यार्थी नसलो तरी प्रथम देशाचे नागरिक आहोत आणि त्यामुळेच येथे हजर असल्याची प्रतिक्रिया दिली.

निषेधाला कलाकार सुशांत सिंह राजपूत यानेही आपली हजेरी लावली. जेएनयूमधील हल्ला म्हणजे सरकारची दडपशाही असून याचा निषेधच आहे. हे सुडाचे राजकारण बंद होण्याची वेळ आली आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी अशाच प्रकारे एकत्र येऊन सामना करायला हवा, अशी प्रतिक्रिया त्याने दिली.

महत्त्वाच्या बातम्या 

JNU Attack: 'बुरखा घालून काळोखात हल्ले करणं म्हणजे मर्दानगी नाही'

जेएनयूमधील हल्ल्याचे देशभरात तीव्र पडसाद

केंद्राच्या चिथावणीमुळेच गुंडांचा ‘जेएनयू’त हल्ला, काँग्रेसचा आरोप

माझ्यावरील हल्ला पूर्वनियोजित -आयशी घोष 

टॅग्स :जेएनयूमुंबईदिल्लीविद्यार्थीपोलिस