वरळीतील गेल्या कित्येक महिन्यांपासून बांधकाम पूर्ण असले तरी बंद असलेल्या पुलाचे उद्घाटन करणाऱ्या आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर मुंबई महापालिकेने गुन्हे दाखल केले आहेत. पुलाची चाचणी झाली नसतानाही आदित्य ठाकरे यांनी पुलाचे उद्घाटन केले, असा आरोप त्यांच्यावर ठेवत दोन अधिकारी मध्यरात्री पोलीस ठाण्यात गेले होते. यावरून आता मुंबईतील राजकारण तापू लागले आहे.
मुंबईतील लोअर परळ उड्डाणपुलाची एक मार्गिका सुरु करण्यात आली होती. परंतु दुसऱ्या मार्गिकेचे काम सुरु होते. हा पूल सुरु करण्यासंदर्भातील यापूर्वी अनेकवेळा डेडलाइन दिल्या होत्या. परंतु पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले नव्हते. हे काम रखडल्यामुळे अखेरीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उद्घाटन करण्यात आले. पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमास आदित्य ठाकरे उपस्थित होते. त्यानंतर लोअर परेल पुलाच उद्घाटन केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते आणि पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
यावर ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी पुलाचे काम पूर्ण झाले आहे, असे सांगतानाचा पालिका अधिकाऱ्यांचा आमच्याकडे व्हिडीओ असल्याचा दावा केला आहे. 10 दिवसांपूर्वी ब्रिज पूर्ण झाला होता. नवरात्रीपर्यंत ब्रिज पूर्ण सुरू करणार असे सांगण्यात आले होते. परंतू, दिवाळी आली तरी हा पूल का सुरु करण्यात आला नाही, असा सवाल अहिर यांनी केला आहे.
अमानुष गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आम्ही लोकांच्या हितासाठी ब्रिज खुला केला. कोणी कोणाच्या सांगण्यावरून कलमं लावली? सत्तेच्या बळावर सुरू आहे. ब्रिज पूर्ण झाला नव्हता हे त्यांनी सिद्ध करावे, असे आव्हान अहिर यांनी दिले आहे. उद्घाटनासाठी कामे अडकवली आहेत. आदित्य ठाकरे यांना ट्विट करावे लागतेय, त्यानंतर मग यांना प्रकल्प सुरू करावे लागतात. चार दिवसांत सुरू करणार असे आता पालिकेचे अधिकारी म्हणत आहेत. चार तासात करता आले असते. एका अॅम्ब्युलन्सला 6 मिनिटे थांबावे लागले होते. पोलिसांना देखील पूल बंद असल्याचा त्रास होतोय. आदित्य ठाकरेंचा वरळी मतदारसंघ आहे, म्हणून हे सुरू आहे. आम्हीच वरळीत काम करतो, हे यांना दाखवायचे आहे, असा आरोप अहिर यांनी केला.
पोलिसांनी कोणाच्या सांगण्यावरून गुन्हे दाखल केलेत? पुढील काळात स्पष्ट होईल. रंग काम बाकी आहे, म्हणून उद्घाटन थांबवले असे कारण दिले जातेय, हे काय चालू आहे? असा सवालही अहिर यांनी केला. आदित्य ठाकरे यांच्यासोबत याबाबत अद्याप चर्चा झाली नाही. आम्ही लीगल टीम सोबत चर्चा करून पुढची भूमिका ठरवू, असेही अहिर म्हणाले.