- सीमा महांगडे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : हाऊस बॉय, असिस्टंट मॅनेजर ते बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजरपर्यंतच्या पदांवर १५०० हून अधिक उमेदवारांना शनिवारी झालेल्या महारोजगार मेळाव्यात नोकऱ्या मिळाल्या आहेत. बीव्हीजी इंडिया, हिंदू रोजगार डॉट कॉम, फास्ट्रेक मॅनेजमेंट सर्व्हिसेससारख्या विविध उद्योग आणि कंपन्यांनी मेळाव्यात मुलाखती झालेल्या उमेदवारांची प्राथमिक निवड जाहीर केली आहे. रोजगार मेळाव्यात मुलाखती झालेल्या उमेदवारांची निवड प्रक्रिया यापुढेही चालू राहणार असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास विभाग मार्गदर्शन केंद्राकडून देण्यात आली.
उमेदवारांना शैक्षणिक पात्रता आणि कामाच्या स्वरूपाप्रमाणे योग्य ते पॅकेज कंपन्यांकडून दिले जाणार असल्याची माहिती मार्गदर्शन केंद्राकडून देण्यात आली आहे. दरम्यान, निवड झालेल्या उमेदवारांमध्ये अभियांत्रिकी पदवीधर आणि एमबीए पदवी प्राप्त विद्यार्थ्यांपासून अप्रेंटिसशीप करणार असलेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश असल्याने कंपन्यांकडून आवश्यक किमान वेतन नियम पाळला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
रोजगार मेळाव्यांच्या आयोजनासाठी आतापर्यंत ६० हजार रुपयांची खर्च मर्यादा होती, ती आता ५ लाख रुपयांपर्यंत वाढविली आहे. यामुळे रोजगार मेळावे प्रभावी पद्धतीने आयोजित करणे शक्य होत आहे. रोजगार मेळाव्यांमध्ये नोकऱ्यांबरोबरच स्वयंरोजगारासाठी शासनाच्या विविध आर्थिक विकास महामंडळाकडून राबविल्या जाणाऱ्या कर्ज योजनांची माहिती, उमेदवारांचे समुपदेशन असे उपक्रमही राबविण्यात येत आहेत. राज्यात येत्या काळात अजून मेळाव्यांचे चांगल्या पद्धतीने आयोजन करून नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात येईल.- मंगलप्रभात लोढा, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री