Join us

यूकेतील नोकरी पडली महागात, ८ लाख रुपयांच्या बदल्यात ‘जॉब’ लावण्याचे आमिष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 2:04 AM

निवृत्तीनंतर घरखर्च भागविणे कठीण होऊ लागले म्हणून वयाच्या ६२व्या वर्षी त्यांनी पुन्हा नोकरी करण्याचे ठरविले. नोकरीसाठी शोधमोहीम सुरू झाली.

मुंबई : निवृत्तीनंतर घरखर्च भागविणे कठीण होऊ लागले म्हणून वयाच्या ६२व्या वर्षी त्यांनी पुन्हा नोकरी करण्याचे ठरविले. नोकरीसाठी शोधमोहीम सुरू झाली. अशातच ठगांच्या जाळ्यात ते अडकले. त्यांना यूकेमध्ये महिना साडे तीन लाख पगार आणि ६४ हजार भत्ता अशा नोकरीचे आमिष दाखविले गेले. या नोकरीसाठी त्यांनी ८ लाख रुपये भरले. पैसे घेऊन आरोपी पसार झाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्यांच्या तक्रारीवरून नेहरूनगर पोलिसांनी मंगळवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे. नेहरूनगर परिसरात ६२ वर्षांचे गोविंद दलजीत तलवार कुटुंबीयांसोबत राहतात. ते एका खासगी कंपनीत कामाला होते. सेवानिवृत्तीच्या पैशांवर त्यांचा घरखर्च भागत होता. काटकसरीच्या जीवनाचा त्यांना कंटाळा आला. म्हणून तलवार यांनी नोकरी करण्याचे ठरवले. विविध ठिकाणी त्यांनी नोकरीसाठी अर्ज केला.याचदरम्यान यूकेमधील डॉ. कोडी मिशेल यांच्या घरी खासगी व्यवस्थापकासाठी जागा रिकामी असल्याचे त्यांना कळाले. महिना साडे तीन लाख आणि ६४ हजार रुपये भत्ता पाहून त्यांनी स्वप्न रंगवण्यास सुरुवात केली. वयाची अट नसल्याने त्यांनी त्या ठिकाणी अर्ज केला. २४सप्टेंबरला त्यांनी त्यांची कागदपत्रे मेलवर पाठवली. या नोकरीसाठी त्यांची निवड झाल्याचा मेल त्यांना आला. फक्त त्यासाठी सुरुवातीला काही पैसे भरावयास लागतील असे सांगितले.नोकरीचे आमिष दाखवून विविध कारणे पुढे करून टोळीने त्यांच्याकडून ८ लाख रुपये उकळले. टोळीने त्यांना यूकेचा बनावट व्हिसाही मेल केला. पैसे देऊनही नोकरी लागत नसल्याने तलवार यांना संशय आला. तसेच डॉ. मिशेल यांचा दिलेला मोबाइल क्रमांकही बंद लागला.यात फसवणूक झाल्याचे समजताच तलवार यांनी नेहरूनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून नेहरूनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून ठगाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती नेहरूनगर पोलिसांनी दिली.