Join us

नोकरीचे आमिष; मनसेशाखाप्रमुखाला अटक

By admin | Published: December 23, 2015 11:34 PM

नवी मुंबईत बोलावले व अमेरिकेत नोकरी लावण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्याने बनावट पद्धतीने अमेरिकेतील एका कंपनीच्या नावाने नोकरीचे कॉल लेटर पाठवले.

अडरे : परदेशात नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून दोघांना १० लाखांना गंडा घालणाऱ्या नवी मुंबई, नेरुळ येथील मनसेच्या शाखाप्रमुखाला चिपळूण पोलिसांनी अटक केली. त्याला तपासासाठी दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मनसेचा शाखाप्रमुख असलेल्या विनय शिवाजी कांबळे याने आॅनलाईन पद्धतीने परदेशात नोकरी लावतो, असे आमिष दाखवून बायोडाटा मागवला होता. आॅनलाईन जाहिराती पाहताना चिपळूण येथील अमित ओतारी व शादाब शेख या दोघा युवकांनी कांबळे यांच्याशी संपर्क साधला. त्याने दोघांचाही बायोडाटा पाहून नवी मुंबईत बोलावले व अमेरिकेत नोकरी लावण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्याने बनावट पद्धतीने अमेरिकेतील एका कंपनीच्या नावाने नोकरीचे कॉल लेटर पाठवले. त्यामुळे दोघांनीही कांबळे याला प्रत्येकी पाच लाख रुपये दिले होते. यानंतर दोघांनीही अमेरिकन वकिलातीमध्ये चौकशी केली असता कॉल लेटर बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आपल्याला फसवल्याचे लक्षात आल्यानंतर दोन महिन्यांपूर्वी दोघांनीही चिपळूण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. या घटनेनंतर कांबळेसह त्याची पत्नीही फरार झाली होती. गेले दोन महिने चिपळूण पोलीस त्याचा शोध घेत होते. कांबळे नवी मुंबईतील घरी आल्याची खबर पोलिसांना मिळाल्यानंतर उपनिरीक्षक सुहास वाकचौरे, हेडकॉन्स्टेबल संजय शिवलकर व कॉन्स्टेबल उमेश कांबळे यांच्या पथकाने कांबळे याला अटक केली. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. (वार्ताहर)