मुंबई : राज्य दहशतवाद विरोधी विभागात (एटीएस) अधिकाऱ्याची जागा रिक्त असून इच्छुकांनी थेट एटीएसच्या अप्पर पोलीस महासंचालकांसोबत संपर्क साधा असे आवाहन पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी त्यांच्या स्वत:च्या फेसबुकद्वारे केली. त्यांची ही पोस्ट सोमवारी सोशल मीडियावर चर्चेचा विषय होता.
संजय पांडे यांच्या पोस्टनुसार, ‘मुंबईत एटीएसमध्ये पोलीस अधीक्षक दर्जाच्या दोन जागा रिक्त आहेत. एटीएस पोस्टिंग ही एक प्रतिष्ठित पोस्टिंग आहे. ज्यात २५ टक्के विशेष भत्ता आहे. इच्छुक अधिकारी हे थेट एटीएसच्या अप्पर पोलीस महासंचालकांशी संपर्क साधू शकता किंवा अप्पर पोलीस महासंचालक अस्थापना येथेही अर्ज करू शकता, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.
थेट अर्ज करण्याची अधिकाऱ्यांना भीती
मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय बर्वे यांची नियुक्ती झाल्यानंतर काही काळातच मुंबईचे कायदा व सुव्यवस्थेचे तत्कालीन सह पोलीस आयुक्त देवेन भारती यांची राज्य एटीएस प्रमुखपदी बदली करण्यात आली. भारती यांच्या एटीएस नियुक्तीनंतर मुंबई पोलीस दलातील काही टॉपच्या अधिकाऱ्यांनी थेट एटीएसमध्ये बदलीचा अर्ज केला. त्यानंतर, बर्वे यांनी या अधिकाऱ्यांना कारवाईबाबत नोटीसा धाडल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. पुढे हा वाद मिटला. त्यानंतर भारती यांची एटीएसमधून बदली झाल्यानंतर बहुतांश अधिकारी आणि अंमलदारांनीही एटीएस सोडले. त्यामुळे पोलीस महासंचालकांच्या आवाहनानंतर किती जण पुढे येतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.