सफाई कामगारांच्या कुटुंबांना नोकरीची शाश्वती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 10:50 AM2023-02-27T10:50:54+5:302023-02-27T10:51:19+5:30
लाड समितीच्या शिफारशींना मंजुरी, फडवणीस यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणाऱ्या सर्व सफाई कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यास मंजुरी देण्यात आली.
एखाद्या कामगाराचे पद काहीही असले आणि त्याला सफाईशी संबंधित काम दिले जात असेल तर त्यांनाही सफाई कामगार संबोधून सर्व लाभ देण्यात येतील. डोक्यावरून मैला वाहण्याचे काम केलेल्या सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरीत प्राधान्य दिले जाईल. वारसा हक्कासाठी सुधारित तरतुदी केल्यामुळे हजारो सफाई कामगारांच्या कुटुंबीयांची अनेक वर्षांची मागणी मान्य झाली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील समितीने याबाबत निर्णय घेतला आहे.
शौचालय स्वच्छता, घाणीशी संबंधित मलनि:सारण व्यवस्था, नाली गटारे, ड्रेनेज तसेच रुग्णालय आणि शवविच्छेदन गृहातील घाणीशी संबंधित ठिकाणी सफाईचे काम करणारे अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्ग, तसेच सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणारे सर्व कामगार आणि पूर्वी डोक्यावरून मैला वाहून नेण्याचे काम केलेल्यांच्या वारसांना सरकारी नोकरीत प्राधान्य देण्यात येईल. रोजंदारी, कंत्राटी तत्त्वावर बाह्य स्रोताद्वारे हे काम करणाऱ्या व्यक्तींना लाभ मिळणार नाही.
या अटीही महत्त्वाच्या
पती किंवा पत्नी, मुलगा किंवा मुलगी, सून किंवा जावई, विधवा मुलगी, बहीण, घटस्फोटीत मुलगी किंवा बहीण, परित्यक्ता मुलगी किंवा बहीण, अविवाहित सज्ञान मुलगी किंवा अविवाहित सज्ञान बहीण, अविवाहित सफाई कर्मचाऱ्याचा सख्खा भाऊ किंवा सख्खी बहीण, नात किंवा नातू आणि यापैकी कोणीही वारस नसल्यास किंवा या वारसांपैकी कोणीही सफाईचे काम करण्यास तयार नसल्यास त्या सफाई कामगाराचा तहहयात सांभाळ करण्याची लेखी शपथपत्राद्वारे हमी देणारी व्यक्ती यांना वारसा हक्काने नोकरीसाठी पात्र समजले जाईल. अशांचे वय किमान १८ वर्षे व कमाल ४५ वर्षे असावे. सफाई कामगाराच्या स्वेच्छानिवृत्तीसाठी किमान १५ वर्षे सेवा करणे बंधनकारक राहील.
तर तत्काळ शिस्तभंगाची कारवाई
सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्ती देण्यात दिरंगाई किंवा टाळाटाळ होत असेल तर शासकीय निमशासकीय कार्यालये व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संबंधितांविरुद्ध तत्काळ शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.
प्रतिज्ञापत्र लागणार
लहान कुटुंबांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याची अट सफाई कामगाराच्या वारसासदेखील लागू राहील. तसेच सफाई कामगारांची पदे व्यपगत होणार नाही. या नियुक्तींसाठी पदभरतीचे निर्बंधदेखील लागू राहणार नाही. वारसास नियुक्ती देण्यापूर्वी त्याचे जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे लागेल.
पदोन्नतीबाबत काय तरतुदी?
सफाई कामगाराची पदोन्नती झाली तरी वारसा हक्काच्या नियमास बाधा येणार नाही. सफाई कर्मचाऱ्यास वर्ग-३ मध्ये पदोन्नती मिळाल्यास बिंदूनामावलीप्रमाणे त्याला पदोन्नती द्यावी लागेल. मात्र, सफाई कामगार सेवेत असताना त्याला सेवेत गट-क मध्ये पदोन्नती मिळाल्यास अशा कामगाराच्या वारसास वारसा हक्काची तरतूद लागू होणार नाही.
ज्येष्ठता यादीतील सफाई कामगारांच्या वारसाची शैक्षणिक अर्हता विचारात घेऊन वर्ग-३ किंवा वर्ग-४ मध्ये नेमणूक करण्यात येईल. वर्ग-३ किंवा वर्ग-४ मधील कोणत्याही पदासाठी शैक्षणिक अर्हता असल्यास ती विचारात घेऊन त्यानुसार त्याला नियुक्ती देण्याची कार्यवाही करण्यात येईल.
सफाई कामगारांच्या जागी त्यांचा वारस नियुक्त होत असल्यामुळे अशा कामगारांना मोफत मालकी हक्काची घरे देण्यात येतील, असे फडणवीस यांनी सांगितले.