मुंबई : कोरोनाचा शिरकाव मुंबईत झाल्यापासून गेली दीड वर्षे मुंबई महापालिकेचे कर्मचारी-अधिकारी दिवस-रात्र काम करीत आहेत. या लढ्यात २२८ कर्मचारी-अधिकारी मृत्युमुखी पडले आहेत. अशा कोविड योद्धांच्या वारसांना महापालिका सेवेत सामावून घेण्याचा प्रशासनाचा विचार सुरू आहे. मात्र या वारसांना त्यांचा शिक्षणानुसार नोकरी दिली जाणार आहे.
पालिकेत अनुकंपा तत्त्वावर नोकरी देताना कामगार, कारकून या पदावर दिली जाते. मात्र कोविडमुळे मृत्यू झालेल्या ९० कर्मचाऱ्यांच्या वारसांपैकी चार ते पाच वारसांनी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केले आहे. त्यामुळे या वारसांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सेवेत सामावून घेण्याची मागणी केली जात आहे. आतापर्यंत २२८ पालिका कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यातील ९१ कर्मचाऱ्यांच्या वारसांना पालिकेने नोकरीत सामावून घेतले आहे.
५० लाख आर्थिक सहाय्य
मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्याबरोबर त्यांच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. आतापर्यंत ९१ कर्मचाऱ्यांच्या वारसांना ही मदत देण्यात आली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही मदत केली जाणार आहे. केंद्र सरकारने १९ कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. यामध्ये तीन कंत्राटी कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. पालिकेने केंद्राकडे आतापर्यंत २०० अर्ज पाठविले.
तब्बल सहा हजारांहून अधिक कर्मचारी बाधित.
मार्च २०२० पासून आतापर्यंत दीड वर्षांत पालिकेच्या सहा हजार ७६६ कर्मचाऱ्यांना कोरोना झाला. यापैकी पाच हजार ८०३ कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत तर, ९६७ कर्मचाऱ्यांवर अद्याप उपचार सुरू आहेत.