मुंबई - भूमिपुत्रांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांच्या हस्ते एमआयडीसीच्या महाजॉब्स संकेतस्थळाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन पद्धतीने या संकेतस्थळाचं उद्घाटन केलं. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे आणि कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक उपस्थित होते. सुभाष देसाई यांनी यावेळी राज्यात नोकरीसाठी डोमिसाइल बंधनकारक असणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे महाजॉबवर नोंदणीसाठी डोमिसाइल आवश्यक असणार आहे.
MAHAJobs हे संकेतस्थळ महाराष्ट्राच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे. काळाची गरज ओळखून सुरु करण्यात आलेल्या या पोर्टलच्या माध्यमातून भूमिपुत्रांना पारदर्शकपणे रोजगार उपलब्ध करून दिला जावा. तसेच मोबाईलवर महाजॉब्स नावाचे ॲप उपलब्ध करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी दिल्या आहेत. तसेच, येथून नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांना डोमिसाइल बंधनकारक असणार आहे. “डोमिसाइल बंधनकारक असल्याने आपोआप भूमिपुत्रांना संधी मिळणार आहे. कंपन्यांनी, उद्योगांनी याचा फायदा घेत स्थानिकांना नोकरी द्यावी. ज्यांच्याकडे कौशल्य नाही ते विकसित करण्यासाठी कौशल्य विकास विभागाला यामध्ये जोडून घेतलं आहे,” असे सुभाष देसाई यांनी म्हटले.
तर, “१०० टक्के स्थानिकांना रोजगार मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण त्यांना काही कालावाधीसाठी वापरुन घेतलं असं होऊ नये. त्यांना कायमस्वरुपी नोकरी मिळाली पाहिजे,” असे दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी सांगितलं. “रोजगारासाठी १७ अशी क्षेत्र निवडली आहेत ज्यामध्ये संधी मिळू शकते. ज्यामुळे ९५० हून अधिक व्यवसाय करु शकतात. तरुणांनी मागे राहू नये. बेरोजगारी संपवण्याची चांगली संधी आहे. नोकरी मागणारे आणि देणारे दोघांना
टाळेबंदीनंतर राज्यात सध्या ६५ हजार उद्योग सुरू झाले आहेत. तर अनेक नवे उद्योग येऊ घातले आहेत. नुकतेच राज्य शासनाने देश-विदेशातील विविध कंपन्यांसोबत सुमारे 17 हजार कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. याखेरीज नवीन उद्योग सुरू करण्यासाठी महापरवाना देणे सुरू केले आहे. अशा स्थितीत उद्योगांत कुशल, अर्धकुशल तसेच अ-कुशल कामगारांची मागणी वाढली आहे. मध्यंतरी कोरोना संसर्गामुळे कामगारांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. हे कामगार परत कधी येतील, याची निश्चिती नाही, त्यामुळे उद्योगांना कामगाराचा तुटवडा भासू नये, तसेच स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी ‘महाजॉब्स’ हे वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे. याकामी उद्योग, कामगार व कौशल्य विकास विभागाच्या सूचना महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत.
रोजगाराच्या शोधात असलेल्या इच्छुकांनी केवळ आपली माहिती महाजॉब्स पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. एकदा नोंदणी केल्यानंतर विविध कंपन्यांकडून इच्छुकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे अथक प्रयत्न व मार्गदर्शनाखाली अत्यल्प वेळेत हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या पोर्टलद्वारे स्थानिक बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असा विश्वास श्री. देसाई यांनी व्यक्त केला आहे.