Join us

कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या नाविकांच्या नोकऱ्या धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 4:05 AM

परदेशी जहाजांवर प्रवेश नाही; राज्यातील ५०० हून अधिक कर्मचाऱ्यांचा समावेशसुहास शेलारलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारत बायोटेकनिर्मित ...

परदेशी जहाजांवर प्रवेश नाही; राज्यातील ५०० हून अधिक कर्मचाऱ्यांचा समावेश

सुहास शेलार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भारत बायोटेकनिर्मित कोव्हॅक्सिन लसीला अद्याप जागतिक आरोग्य संघटनेची (डब्लूएचओ) मान्यता न मिळाल्याने परदेशात नोकरी वा शिक्षणानिमित्त जाणाऱ्यांची कोंडी झाली आहे. नाविकांना ही समस्या प्रामुख्याने जाणवत आहे. युरोपियन राष्ट्रे, संयुक्त अरब अमिरात, सिंगापूर, मलेशियासारख्या अनेक देशांतील शिपिंग कंपन्यांनी कोव्हॅक्सिन घेतलेल्यांना प्रवेश नाकारल्याने भारतीय नाविकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.

कोरोना संक्रमण सुरू झाल्यानंतर मायदेशी परतलेले नाविक गेल्या वर्षभरापासून बेरोजगार आहेत. या साथरोगाचा जोर हळूहळू ओसरू लागल्यापासून विविध देशांनी निर्बंधांत शिथिलता देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एप्रिल-मेपासून बहुतांश शिपिंग कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना रुजू होण्याचे आदेश जारी केले आहेत; परंतु ‘लसगोंधळा’मुळे हातच्या नोकरीवर पाणी सोडण्याची वेळ भारतीय नाविकांवर ओढावली आहे.

तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे अहवाल येण्याआधी केंद्र सरकारने आपत्कालीन वापरासाठी कोव्हॅक्सिनच्या वापरास मंजुरी दिली; परंतु जागतिक आरोग्य संघटनेच्या मान्यताप्राप्त लसींच्या यादीत अद्याप तिचा समावेश न झाल्याने यूके, यूएई, सिंगापूरसह मलेशियातील शिपिंग कंपन्यांनी आक्षेप घेतला आहे. कोविशिल्डची लस घेतलेल्या भारतीय नाविकांना रुजू करून घेण्यास या कंपन्या प्राधान्य देत आहेत. तर कोव्हॅक्सिन घेतलेल्यांना डब्ल्यूएचओच्या मान्यतेपर्यंत वाट पाहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत, अशी माहिती ऑल इंडिया सिफेरर्स युनियनचे कार्याध्यक्ष अभिजित सांगळे यांनी दिली.

* किती नाविकांना फटका?

देशभरातील एकूण नाविकांपैकी २ हजारांहून अधिक जणांनी कोव्हॅक्सिन लस घेतल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. राज्यातील ५०० ते ६०० नाविकांचा यात समावेश आहे. आता दुसरी लस घेता येत नसल्याने हे कर्मचारी कोंडीत सापडले आहेत. भारतातील दुसऱ्या लाटेचा उद्रेक आणि नव्या डेल्टा प्लस विषाणूच्या रुग्णवाढीमुळे या परदेशी कंपन्या कोणत्याही प्रकारची सूट देण्यास तयार नाहीत. जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळेपर्यंत वाट पहा, असे संबंधित जहाज कंपन्यांकडून त्यांना सांगितले जात आहे. तोपर्यंत नोकऱ्या टिकतील की नाही, याची चिंता नाविकांना आहे, असेही सांगळे यांनी सांगितले.

* डब्ल्यूएचओला लिहिले पत्र

कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळवण्यासाठी भारत बायोटेकने कृतिशील प्रयत्न करायला हवेत. अन्यथा हे सर्व नाविक बेरोजगार होतील. आम्हीसुद्धा डब्ल्यूएचओला पत्र लिहून नाविकांच्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या आहेत.

- अभिजित सांगळे, कार्याध्यक्ष, ऑल इंडिया सिफेरर्स युनियन

...............................................................