जान्हवी कुकरेजा हत्याप्रकरणातील आराेपी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जान्हवी कुकरेजा (१९) या विद्यार्थिनीची हत्या केल्याचा आरोप असलेल्या श्री जोगधनकर याला कारागृहातूनच ‘ऑनलाइन’ परीक्षा देण्याची परवानगी सत्र न्यायालयाने दिली. त्यानुसार आवश्यक ती तयारी करण्याचे निर्देश महानगर दंडाधिकाऱ्यांनी तळोजा कारागृह अधीक्षकांना शुक्रवारी दिले.
जोगधनकर हा बॅचलर ऑफ सायन्स करत असून त्यासाठी त्याने परीक्षा देणे आवश्यक आहे. कुकरेजाच्या हत्येप्रकरणी त्याला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याची रवानगी तळोजा कारागृहात केली. त्यानुसार वांद्रे सत्र न्यायालयाचे दंडाधिकारी जयदेव घुले यांनी तळोजा कारागृह अधीक्षकांना त्याच्या ‘ऑनलाइन’ परीक्षेसाठी कारागृहातच सोय करण्याचे निर्देश दिले. जेणेकरून परीक्षा देताना त्याला कोणताही त्रास होणार नाही.
जोगधनकरची ३० मार्च, २०२१ रोजी ‘हॉस्पिटॅलिटी अँड हॉटेल ॲडमिनिस्ट्रेन’ या विषयाची परीक्षा आहे. त्याचा आणखी एक पेपर ५ एप्रिल, २०२१ रोजी आहे. त्यानुसार त्याला शिक्षण पूर्ण करण्यासाठी न्यायालयाकडून सहकार्य करण्यात आले. याची प्रत खार पोलिसांनाही शुक्रवारी मिळाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. जान्हवी कुकरेजा हिचा मृतदेह ३१ डिसेंबर, २०२० रोजी ती राहत असलेल्या इमारतीमध्ये सापडल्याने खळबळ उडाली होती.
............................