जोगेश्वरीत साडेतीन कोटींची स्मशानभूमी, महापालिकेचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 05:23 AM2018-10-11T05:23:11+5:302018-10-11T05:23:28+5:30
जोगेश्वरी पूर्वेकडील प्रतापनगर येथील महापालिकेची राजेश्वर वामन रागिनवार हिंदू स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. महापालिका के/पूर्व विभागाच्या अखत्यारीतील प्रतापनगर स्मशानभूमीची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय पालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे.
मुंबई : जोगेश्वरी पूर्वेकडील प्रतापनगर येथील महापालिकेची राजेश्वर वामन रागिनवार हिंदू स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. महापालिका के/पूर्व विभागाच्या अखत्यारीतील प्रतापनगर स्मशानभूमीची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय पालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. यासाठी पालिकेने तब्बल ३ कोटी ५२ लाख रुपयांची तरतूद केली आहे. स्मशानभूमीचे काम १ आॅक्टोबर रोजी सुरू होणार असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली. परंतु आता ९ आॅक्टोबर उजाडला असून, अद्याप स्मशानभूमीचे काम सुरू झालेले नाही.
स्मशानभूमीच्या पुनर्बांधणीत दफनभूमी, शवदाहिनी, पर्जन्य वाहिन्या, मृत्यू नोंदणी कार्यालय आणि वखार मोडकळीस आली असून, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्यामुळे स्मशानभूमी नव्याने बांधण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांत स्मशानभूमीच्या डागडुजीसाठी दोन ते तीन कोटी रुपये खर्च करण्यात आले होते, तरीही बांधकाम धोकादायक अवस्थेत आहे, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. स्मशानभूमीत ७ हजार ६६२ चौरस फुटांचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्यामुळे जुने बांधकाम तोडून आरसीसी बांधकाम करण्यात येणार आहे. यात शवदाहिनीसह प्रार्थनास्थळ, पादचारी पायवाटा, स्टेनलेस स्टील रेलिंग, सुसज्ज शौचालयासह अपंगांसाठी स्वतंत्र शौचालय, सुरक्षा भिंती, पंप हाउस, रंगकाम, शवदाहिनीसाठी ओटा व ग्रॅनाइट फरशी आदी कामे केली जाणार आहेत. महापालिकेने ही स्मशानभूमी तोडून पुन्हा बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या बांधकामासह येथील परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुनर्बांधणीला स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, एक महिना उलटूनही महापालिकेने नेमलेल्या कंत्राटदाराने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली नसल्यामुळे पालिकेच्या कामावर स्थानिकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. याबाबत पालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता उत्तर प्राप्त झाले नाही. नगरसेवक प्रवीण शिंदे म्हणाले की, स्मशानभूमीच्या कामाला मंजुरी मिळाली असून, सर्व प्रक्रिया झालेल्या आहेत. काम सुरू होण्यासाठी पाठपुरावा चालू आहे.
पीएनजी यंत्रणेची मागणी
स्थायी समितीने जरी मंजुरी दिली, तरी कंत्राटदारांना काम मिळायला वेळ लागतो. बांधकामाची परवानगी मिळाल्यावर त्यांच्या बांधकाम साहित्याची तपासणी केली जाते. त्यानंतर, कामाला सुरुवात केली जाते. पावसाळा संपल्याशिवाय आपण कामाला सुरुवात करू शकत नाही. त्यामुळे कंत्राटदाराला बांधकामाची परवानगी मिळाल्यावर कामाला सुरुवात होईल.
- अभिजित सामंत, सदस्य, स्थायी समिती