जोगेश्वरीत भरधाव कारच्या धडकेत तरुणी १० फूट उंच उडाली; घटना सीसीटीव्हीत कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 01:45 AM2019-01-02T01:45:41+5:302019-01-02T01:45:54+5:30
मित्राला भेटून घरी परतत असलेल्या सायली राणे या तरुणीला भरधाव कारने धडक दिली. या धडकेत ती १० फूट उंच उडून रस्त्याकडेला फेकली गेली. या अपघातात ती गंभीर जखमी असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
मुंबई : मित्राला भेटून घरी परतत असलेल्या सायली राणे या तरुणीला भरधाव कारने धडक दिली. या धडकेत ती १० फूट उंच उडून रस्त्याकडेला फेकली गेली. या अपघातात ती गंभीर जखमी असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ३ दिवस उलटूनही ती शुद्धीवर आलेली नाही. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, मंगळवारी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.
जोगेश्वरीत सायली आईवडील आणि दोन भावंडांसोबत राहते. वडील रिक्षाचालक आहेत, तर सायली दोन आठवड्यांपूर्वीच एका नामांकित बँकेत वरिष्ठ पदावर रुजू झाली होती. शनिवारी सायंकाळी ४ च्या सुमारास कामानिमित्त मित्राला भेटून ती घराच्या दिशेने निघाली. रस्त्याच्या कडेने जात असताना, भरधाव वेगाने आलेल्या कारने तिला धडक दिली. या धडकेत ती १० फूट उंच उडून रस्त्याकडेला पडली.
या भीषण अपघातात ती गंभीर जखमी झाली आहे. तिला स्थानिकांनी तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. सायली बेशुद्ध अवस्थेत असून, तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
या प्रकारामुळे सायलीच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. कारचालकाचे नाव विश्वजीत हाटे (६५) असून तोदेखील बँकेतून निवृत्त झालेला आहे. त्याची कार पोलिसांनी जप्त केली आहे. मंगळवारी या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली.
दरम्यान, या अपघात प्रकरणी चालकाला अद्याप अटक करण्यात आली नाही. अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
चालकाला अद्याप अटक नाही
चालकाला अद्याप अटक करण्यात आली नाही. या घटनेचा सीसीटीव्हीच्या आधारे अधिक तपास सुरू असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन अलकनुरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.