मुंबई : जोगेश्वरी पूर्व-पश्चिम असा प्रवास करणाऱ्या वाहनचालकांची लवकरच वाहतूककोंडीतून सुटका होणार आहे. त्याचबरोबर जोगेश्वरी पूर्व-पश्चिम हा प्रवास अवघ्या काही मिनिटांमध्ये करणे शक्य होणार आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावरून जोगेश्वरी पूर्व-पश्चिम असा प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीचा सामना करावा लागत होता. यातून वाहनचालकांची सुटका करण्यासाठी वायकर यांनी या पुलाची संकल्पना मांडली. २००९ मध्ये जोगेश्वरी पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या या पुलाच्या उभारणीसाठी एकूण ५.७ हेक्टर एवढ्या क्षेत्रफळाच्या जागेची आवश्यकता होती. पैकी ५.२ हेक्टर एवढी जागा मुंबई महानगरपालिका यांना संपादित करायची होती. या उड्डाणपुलाची एकूण लांबी १.३ किलोमीटर एवढी आहे. तर रुंदी ३५ मीटर एवढी आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी येथील जागेवरील अनेक झोपड्या व दुकाने निष्कासित करण्याचे आव्हान पालिकेसमोर होते. हा प्रकल्प जून २००९ मध्ये एमएमआरडीएकडून महानगरपालिकेला हस्तांतरित करण्यात आला. त्या वेळी प्रकल्पबाधित व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी आवश्यक तेवढ्या सदनिका व अनिवासी गाळे महानगरपालिकेला उपलब्ध करून देण्याचे आश्वासन एमएमआरडीएने दिले होते. परंतु हे गाळे मिळण्यास एमएमआरडीएकडून विलंब झाल्याने प्रकल्पाची गती मंदावली. ही समस्या दूर करण्यासाठी आमदार व मंत्री रवींद्र वायकर यांनी सातत्याने महापालिका आयुक्त यांच्यासमवेत बैठका घेऊन पाठपुरावा केला. त्याचबरोबर वेळोवेळी प्रकल्पबाधितांसमवेत बैठका घेतला. येथील प्रकल्पबाधित दुकानदारांना तात्पुरत्या स्वरूपात पुलाखालीच गाळे देण्यात आले तसेच येथील हुनमान मंदिराची नव्याने पुनर्स्थापना केली. अडथळे दूर झाल्याने प्रकल्प जवळजवळ पूर्ण होण्याच्या मार्गावर असून तो लवकर वाहनचालकांसाठी खुला करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
जोगेश्वरी पूर्व-पश्चिम जोडणारा उड्डाणपूल लवकरच खुला
By admin | Published: August 04, 2015 2:32 AM