जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडच्या वाहतूककोंडीतून होणार सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 02:40 AM2017-12-09T02:40:28+5:302017-12-09T02:40:44+5:30
जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड तसेच पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतुकीच्या कोंडीवर बोलाविण्यात आलेल्या बैठकीत तोडगा काढण्यात आल्याने वाहनचालकांची तसेच रहिवाशांची लवकरच वाहतूककोंडीतून सुटका होणार आहे
मुंबई : जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड तसेच पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतुकीच्या कोंडीवर बोलाविण्यात आलेल्या बैठकीत तोडगा काढण्यात आल्याने वाहनचालकांची तसेच रहिवाशांची लवकरच वाहतूककोंडीतून सुटका होणार आहे. आरेतील कोसळलेला पूल नव्याने बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून हा पूल १५ जानेवारी २०१८ पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे आश्वासन महापालिकेच्या वतीने स्थानिक आमदार आणि राज्यमंत्री रवींद्र वायकर यांना देण्यात आले आहे.
येथील वाढत्या वाहतूककोंडीमुळे या मार्गावरून जाणारे वाहनचालक तसेच रहिवासी मेटाकुटीला आले आहेत. आरेतील पूल कोसळल्याने जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील वाहतुकीत वाढ झाली आहे. वाढत्या वाहतूक समस्येवर मार्ग काढण्यासाठी रवींद्र वायकर यांनी शुक्रवारी जोगेश्वरी वाहतूक विभाग कार्यालयात तातडीची बैठक घेतली. बैठकीला सह पोलीस आयुक्त (वाहतूक) अमितेश कुमार, पोलीस उपायुक्त (वाहतूक) संजय जाधव, परिमंडळ १० चे उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त सौरभ त्रिपाठी, एसीपी मिलिंद खेतले, नगरसेवक बाळा नर, प्रवीण शिंदे, रेखा रामवंशी, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, मेट्रो, महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
अमितेश कुमार यांनी पश्चिम द्रुतगती महामार्गावरील जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडच्या जंक्शनवरील सर्व खड्डे तातडीने बुजविण्यात यावे, अशी सूचना करताच एमएमआरडीएच्या अधिकारी देढे यांनी ७ दिवसांमध्ये हे खड्डे बुजविण्यात येतील, असे आश्वासन दिले. जोपर्यंत द्रुतगती मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे, तोपर्यंत नेस्कोमध्ये वीकएन्डपर्यंत ५० टक्क्यांपेक्षा जास्त एरियामध्ये प्रदर्शन भरविण्यात येऊ नये, असे पत्र नेस्कोच्या व्यवस्थापनाला देण्यात आल्याची माहिती अमितेश कुमार यांनी वायकर यांना दिली.
त्याचबरोबर नेस्कोच्या ज्या जागांमध्ये पार्किंगची व्यवस्था आहे, त्या जागेवर हँगर लावून प्रदर्शन भरविण्यास परवानगी देण्यात येऊ नये, अशा सूचनाही महापालिकेला तसेच नेस्कोच्या व्यवस्थापनाला देण्यात आल्याचे कुमार यांनी या वेळी सांगितले.
मुसळधार पावसामुळे कोसळलेल्या आरेतील पुलामुळे येथील वाहतूक जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर वळविण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा ताण अधिक वाढला आहे. कोसळलेल्या पुलाच्या जागी महापालिकेत नवीन पूल बांधण्याचे काम सुरू असून १५ जानेवारी २०१८ पर्यंत तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल.जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील अनधिकृत गॅरेज कायमस्वरूपी काढून टाकण्यासाठी महापालिकेने कठोर पावले उचलावीत, सर्व्हिस रोडवरील दुकाने हटविण्यात यावे, अशा सूचना वायकर यांनी के-पूर्व विभागाचे साहाय्यक महापालिका आयुक्त जैन यांना दिल्या. पश्चिम द्रुतगती मार्गावर ज्या ठिकाणी मेट्रोने अनावश्यक बॅरिकेड लावले आहे, तसेच ज्या ठिकाणी पिलरचे काम पूर्ण झाले आहे त्या ठिकाणचे बॅरिकेड्स तातडीने काढून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा. त्याचबरोबर पश्चिम द्रुतगती मार्गावरील उड्डाणपुलावर पडलेले खड्डे तातडीने बुजविण्यात यावे, अशा सूचना वायकर यांनी मेट्रोच्या तसेच एमएसआरडीसीला दिल्या.