Join us

जोगेश्‍वरी-विक्रोळी जोडरस्‍त्यातील बाधीतांचे पंतप्रधान आवास योजनेअतंर्गत पुनर्वसन करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 7:39 PM

जोगेश्‍वरी-विक्रोळी जोडरस्‍ता, जोगेश्‍वरी पश्चिम बाजूकडील गेल्‍या अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्‍थेत आहे.

मुंबई - जोगेश्‍वरी-विक्रोळी जोडरस्‍ता, जोगेश्‍वरी पश्चिम बाजूकडील गेल्‍या अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्‍थेत आहे. एकूण तीन विकासक या रस्‍त्‍याच्‍या आराखड्यामध्‍ये झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत कार्यरत आहेत. येथील पात्र झोपडपट्टी धारकांचे लवकरच पुनर्वसन करण्‍यात येईल. परंतु ५६ झोपडपट्टी धारकांच्‍या पात्रतेबाबत समस्‍या निर्माण झाल्‍यामुळे त्‍यांचे पुनर्वसन पंतप्रधान आवास योजने अंतर्गत करण्‍यात यावे अशी आग्रही मागणी उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सचिन कुर्वे  यांच्या कडे केली आहे. त्‍यांनी त्‍वरीत ती मागणी मान्‍य केली अशी माहिती खासदार कीर्तिकर यांनी दिली.

यामुळे विस्तारित जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडच्या कामाला गती येऊन भविष्यात येथील वाहतूक कोंडी कमी होऊन वर्सोवा येथील लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळेल असा विश्वास खासदार कीर्तिकर यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केला.

याबाबत सचिन कुर्वे यांच्या दालनात उच्‍च अधिका-यांसमवेत आज दुपारी एक महत्वाची बैठक आयोजित करण्‍यात आली होती. यावेळी महिला विभागसंघटक व  नगरसेविका  राजुल पटेल, मनपा उपायुक्‍त किरण आचरेकर,के पश्चिम सहाय्यक पालिका आयुक्‍त  प्रशांत गायकवाड, उप जिल्‍हाधिकारी कोळेकर व स्‍थानिक सोसायटीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 मुंबईत १४ मच्छिमार वसाहती महानगरपालिकेने घोषित केल्‍या असून १५ वसाहतींच्‍या जनगणनेचे काम आयुक्‍त, मत्‍स्‍य व्‍यवसाय विभाग यांच्यामार्फत प्रगतीपथावर आहे. सदर जनगणनेचे काम पूर्ण झाल्‍यानंतर स्‍थानिक मच्छिमार बांधवांच्‍या नावाने सात-बारा उतारा करण्‍याबाबतची कार्यवाही करण्‍यात येईल असे आश्‍वासन उपनगर जिल्‍हाधिकारी यांनी दिले अशी माहिती कीर्तिकर यांनी शेवटी दिली. 

टॅग्स :घरमुंबई