मैदानासाठी पालिकेवर जोगेश्वरीकरांचा मोर्चा
By admin | Published: April 24, 2017 02:44 AM2017-04-24T02:44:56+5:302017-04-24T02:44:56+5:30
जोगेश्वरीतील संजय नगर मैदानातील जॉगिंग ट्रॅकचे बांधकाम बंद करुन ते खेळण्यासाठी आरक्षित ठेवावे, या मागणीसाठी नागरिकांनी
मुंबई : जोगेश्वरीतील संजय नगर मैदानातील जॉगिंग ट्रॅकचे बांधकाम बंद करुन ते खेळण्यासाठी आरक्षित ठेवावे, या मागणीसाठी नागरिकांनी अंधेरीतील महापालिकेच्या के-पूर्व कार्यालयावर मोर्चा काढला. पालिका अधिकाऱ्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निषेधार्थ यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.
जोगेश्वरी पूर्व येथे पालिकेची तीन मैदाने असून त्यापैकी दोन मैदानांवर १०० मीटरचे जॉगिंग ट्रॅक बांधले आहेत. सुधार समितीचे अध्यक्ष व स्थानिक नगरसेवक बाळा नर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र आता मुलांना खेळण्यासाठी एकमेव जागा असलेल्या मैदानावरही जॉगिंग ट्रॅक बांधण्यात येत असल्याने स्थानिकांकडून तीव्र विरोध होत आहे. क्रीडांगण नसेल तर मुले खेळणार कुठे? असा सवाल करीत स्थानिकांना ट्रॅक बांधण्यास हरकत नोंदवली.
आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून पालिकेच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. मात्र यापुढेही जॉगिंग ट्रॅकचा प्रकल्प मागे घेतला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या मोर्चाचे निमंत्रक संजीव शामंथुल यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)