Join us  

‘जॉन्सन ॲन्ड जॉन्सन’ला बेबी पावडर विक्रीस मनाई, उत्पादनास मात्र परवानगी: उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 9:08 AM

Johnson & Johnson: उच्च न्यायालयाने बुधवारी जॉन्सन ॲन्ड जॉन्सन कंपनीच्या बेबी टाल्कम पावडरच्या नमुन्यांची पुन्हा एकदा चाचणी करण्याचे आदेश दिले तसेच कंपनीला स्वत:च्या जोखमीवर बेबी टाल्कम पावडरचे उत्पादन करण्यास न्यायालयाने परवानगीही दिली.

मुंबई : उच्च न्यायालयाने बुधवारी जॉन्सन ॲन्ड जॉन्सन कंपनीच्या बेबी टाल्कम पावडरच्या नमुन्यांची पुन्हा एकदा चाचणी करण्याचे आदेश दिले तसेच कंपनीला स्वत:च्या जोखमीवर बेबी टाल्कम पावडरचे उत्पादन करण्यास न्यायालयाने परवानगीही दिली. मात्र, बेबी पावडरची विक्री करण्यास मनाई केली.कंपनीने राज्य सरकारच्या १५ व २० सप्टेंबरच्या आदेशास उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या दोन्ही आदेशांद्वारे राज्य सरकारने  कंपनीचा परवाना रद्द केला व पावडरचे उत्पादन व विक्री करण्यास मनाई केली. कंपनीने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी न्या. एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. एस. जी. डिगे यांच्या खंडपीठापुढे होती.कोलकातास्थित केंद्रीय औषध प्रयोगशाळेने कंपनीच्या बेबी टाल्कम पावडरमध्ये आवश्यकतेपेक्षा अधिक पीएच लेव्हल असल्याचे अहवालात म्हटले आहे. या अहवालाचा हवाला देत राज्य सरकारने जॉन्सन ॲन्ड जॉन्सनवर कारवाई केली. बुधवारच्या सुनावणीत न्यायालयाने राज्य सरकारला कंपनीच्या मुलुंड येथील फॅक्टरीमधून पावडरचे नमुने गोळे करण्याचे आदेश दिले. 

टॅग्स :न्यायालयआरोग्य