मुंबई - माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीससोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. अनेकदा त्यांच्या गाण्यांमुळे त्या नेटिझन्सच्या ट्रोलिंगचा भाग बनल्या आहेत. अमृता फडणवीस यांनीही याकडे खूप वेळा दुर्लक्ष केलं आहे. मात्र सध्या एका नेटिझन्सने टाकलेल्या एका पोस्टमुळे अमृता फडणवीस यांचा पारा चांगलाच चढल्याचं पाहायला मिळत आहे. या युजरविरोधात अमृतांनी थेट मुंबई पोलिसांची मदत मागितली आहे.
अमृता फडणवीस या देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आहेत. त्याचसोबत त्या एक बँकर आहेत. त्या अॅक्सिस बँकेत कामाला आहेत. एका युजरने अमृता फडणवीस यांच्या नोकरीवरून त्यांचा फोटो टाकून कमेंट केली त्याला अमृता यांनी उत्तर दिलं आहे. या यूजरने लिहिलंय की, मित्रांनो, अॅक्सिस बँकेत चांगलाच स्कोप आहे. तुम्ही कॅशियर म्हणून जॉईन करून मॅनेजर अगदी व्ही पी पण होऊ शकता. अट एकच... असं पोस्ट करत अमृता फडणवीसांचा फोटो टाकला आहे.
यावर अमृता फडणवीस यांनी त्या युजरला चांगलंच सुनावलं आहे. त्या म्हणाल्या की, 'हा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा उद्धटपणा आहे की, अनेक वर्षं समर्पित भावनेनं काम करणाऱ्या स्वावलंबी आणि स्वतंत्र स्त्रियांचं नाव पुरुषांशी जोडून ते त्यांचं चारित्र्यहनन करत आहेत. हे फक्त एक ट्विट नाही तर अशी अनेक ट्विट केली आहेत. मुंबई पोलीस आयुक्त, तुम्ही त्यांच्या दबावाखाली नसाल अशी आशा आहे. कारवाई करा.''
महाविकास आघाडी समर्थक असं ट्विटर प्रोफाईलमध्ये लिहिलेल्या संतोष शिंदे यांनी ही पोस्ट केली. त्याला अमृता फडणवीस यांनी रिप्लाय दिला. त्यावर मित्रांनो, गुणवत्ता असेल तर अँक्सिस बँकेत तुम्ही वरच्या पदापर्यंत पोहचू शकता... इतकंच लिहिलं आहे, यातून त्यांनी असा वाकडा अर्थ का घेतला मला समजत नाही! आणि मी थोड कामात व्यस्त असल्याने तुमच्या DM, reply किंवा फोन कॉल्स ना उत्तर देऊ शकत नाही! नंतर रिप्लाय करेन! असं उत्तर संतोष शिंदेंनी दिलं आहे.
काँग्रेस नेते भाई जगतापांवरही साधला होता निशाणा
काँग्रेस नेते भाई जगताप (Bahi Jagtap) यांनी, पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे सॅलरी अकाउंट्स अॅक्सिस बँकेत (Axis bank) वळविल्यावरून माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. यावर फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी भाई जगताप यांच्यावर पलटवार केला होता. विशेष म्हणजे अमृता यांनी एकेरी उल्लेख करत जगतापांना प्रत्युत्तर दिलं होतं. "ए भाई , तू जो कोण असशील - माझ्या वर बोट उचलायचं न्हाय! पोलिसांची खाती तुमच्याच राज्यात तुम्ही ‘UTI बैंक / Axis बैंक ‘ ला योग्यता पाहून दिली होती! लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवचायचं न्हाय!" असं अमृता फडणवीसांनी सुनावलं होतं.