Join us

‘जॉईन पोलीस, बी पोलीस इन सिव्हिल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 4:06 AM

मुंबई : शहरात भुरट्या चोरीचे प्रमाण वाढीस लागले आहे. त्यावर उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी आता मुंबईकरांचीच मदत घेण्याची अनोखी ...

मुंबई : शहरात भुरट्या चोरीचे प्रमाण वाढीस लागले आहे. त्यावर उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी आता मुंबईकरांचीच मदत घेण्याची अनोखी शक्कल लढविली आहे. जुहू पोलिसांनी याची सुरुवात केली असून शुक्रवारी नाकाबंदी, पेट्रोलिंग आणि फिक्स पॉईंटवर आता स्थानिकांना पोलिसांसोबत तैनात करण्यात आले आहे.

जुहूमध्ये सोहम स्पा, व्ही. एम. रोड, टेंथ रोड व जेव्हीपीडी, तर फिक्स पॉईंट लक्ष्मीकांत चौक, नोबेल केमिस्ट, जितेंद्र बंगलो, कैफी आझमी गार्डन आणि गुलमोहोर रोड याठिकाणी शुक्रवारी २५ स्थानिकांना तैनात करण्यात आले.

जुहूमध्ये बऱ्याच अशा गल्ल्या व ठिकाणे आहेत ज्याठिकाणी जुहू पोलीस ठाण्यातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे बंदोबस्त ठेवण्यात अडथळे येतात, त्यामुळे आता १८ वर्षे आणि त्यापुढील वयोगटातील नागरिकांकडे याची जबाबदारी देण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार अधिकाधिक इच्छुकांनी जुहू पोलिसांना संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ‘पोलिसांना सहकार्य करणाऱ्यांना आम्ही विशिष्ट पोलीस टी शर्ट देणार असून संध्याकाळी ७ ते १० च्या दरम्यान त्यांना पॉईंटसवर हजर राहावे लागेल. आपले कर्तव्य चोख बजावणाऱ्याना चहा आणि स्नॅक्स पुरवत विशिष्ट कालावधीनंतर त्यांचा सत्कार केला जाईल’, असे जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत माने यांनी सांगितले. आमच्याकडे अद्याप यासाठी ६० अर्ज आले असून २५ जणांना जबाबदारी सोपविण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.