नवी दिल्ली - राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यापासून शिवसेनेने स्वागत केले आहे. शेकडो शिवसैनिक भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. दिल्लीत यात्रा आल्यानंतर आमचे खासदार सहभागी झाले. काश्मीर, पंजाबमध्ये यात्रा पोहचल्यानंतर मी सहभागी होईन, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. राहुल गांधी श्रीनगरमध्ये जाऊन तिरंगा फडकवणार आहेत ही ऐतिहासिक गोष्ट आहे. हजारो तरुण, वृद्ध महिला यात्रेत सहभागी झालेत. आता मीही भारत जोडो यात्रेत सहभागी होत असल्याचं राऊत यांनी ट्विटरवरुन सांगितलं.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली तेव्हा नुकतेच संजय राऊत तुरुंगातून सुटून बाहेर आले होते. मात्र, यादरम्यान त्यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी होणं टाळलं. होतं. त्यावेळी, आदित्य ठाकरे आणि शिवसेना पदाधिकारी यात्रेत सहभागी झाले होते. राहुल गांधींनी महाराष्ट्रात येताच स्वातंत्र्यवीर् सावरकर यांच्यावर टीका केली होती. राज्यात भाजपकडून त्याच मुद्दयावरुन शिवसेनेला लक्ष्य केलं जात होतं. त्यामुळेच संजय राऊत यांनी ती वेळ टाळली. आता, संजय राऊत थेट काश्मीरमधून भारत जोडो यात्रेत सहभागी होत आहेत.
राऊत यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. मी २० जानेवारीपासून जम्मू येथून भारत जोडो यात्रेत सहभागी होत आहे. देशाच्या अखंड एकतेसाठी मी चालणार आहे. स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विशेष बॉन्ड असलेल्या ठिकाणाहून मी या यात्रेत सहभागी होत आहे, असेही राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
राहुल गांधींची यात्रा तपस्वीप्रमाणे संजय राऊत यांनी राहुल गांधींच्या टीशर्टवरून वाद निर्माण करणाऱ्यांनीही फटकारलं आहे. राऊतांनी म्हटलं की, कपड्यावरून कसले वाद करता? राहुल गांधी तपस्वीप्रमाणे यात्रा करतायेत अशी लोकांची भावना आहे. त्या भावनेला तडा देण्याचं काम काहीजण करतायेत. सत्ताधाऱ्यांनी धसका घ्यावा अशी भारत जोडो यात्रा आहे. राहुल गांधी यांचे नेतृत्व उजळून निघालं आहे. या यात्रेचा फायदा देशातील लोकशाहीला मजबूत करण्यासाठी होऊ शकतो. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा यशस्वी करून दाखवली. ही एका राजकीय पक्षाची यात्रा नसून देशातील लाखो कोट्यावधी लोकांची भावनेतून ही यात्रा निघाली आहे असं त्यांनी सांगितले.